महायुतीत केवळ इषारे देऊन काही उपयोग होत नाही, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या आपण प्रतीक्षेत आहोत, असे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीत सांगितले. शिवाजी महाराजांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समुद्रात स्टॅच्यू ऑफ इक्वि टी या नावाने स्मारक उभे करावे, अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
खा. आठवले यांनी सांगितले की, दोन दिवस दुष्काळी भागाचा दौरा करणार असून २२ स्प्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे रिपाइंच्या वतीने दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाखाऐवजी २५ लाख रुपये मदत शासनाने दिली पाहिजे. रिपाइंनेसुध्दा मदतीचे प्रयत्न सुरू केले असून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे करीत असलेली मदत स्तुत्य असून मुख्यमंत्री निधीलाही मोठय़ा प्रमाणात मदत मिळत आहे. त्याचा हिशोब जनतेला मिळायला हवा असेही त्यांनी सांगितले.
कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित सांगलीत सापडावा हे दुर्दैवी असून पुरोगामी विचारांच्या सांगलीत अशा प्रवृत्ती अशोभनीय आहेत. आपण सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली असून या प्रवृत्ती समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकसंघ समाजाला अशा प्रवृत्तींपासून धोका आहे. यामुळे शासनाने सनातनवर बंदी घालावी असेही खा. रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.