राज्य विधिमंडळ सभागृहात सत्ताधारी भाजपच्या आग्रहातून  ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिलेला नकार आणि त्यामुळे विधिमंडळ अधिवेशन संपेपर्यंत त्यांचे झालेले निलंबन, या सर्व प्रकरणात भाजपबरोबर काँग्रेस फरफटत गेला नाही. परंतु यात काँग्रेसची भूमिका निश्चितच चुकली आहे, अशी कबुली पक्षाचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई यांनी दिली. यासंदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार दलवाई हे रविवारी एका खासगी कार्यक्रमासाठी सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. विधानसभा सभागृहात भाजपच्या एका आमदाराने तावातावाने ‘भारतमाता की जय’ म्हणण्याची सक्ती केली असता त्यास एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी नकार दिला. त्यामुळे गोंधळ होऊन पठाण यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. यात भाजपला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही साथ दिली. त्याकडे लक्ष वेधले असता दलवाई यांनी काँग्रेसची भूमिका चुकीची ठरल्याची स्पष्ट कबुली दिली. ‘भारतमाता की जय’ या घोषणेला कोणाचाही विरोध नाही. परंतु त्यासाठी बळजबरी करणे योग्य नाही. बळजबरीने ‘भारतमाता की जय’ म्हणण्याची अपेक्षा करणे साफ चुकीचे आहे. देशात जातीय व धार्मिक उन्माद वाढत असताना त्यात राष्ट्रवाद व देशभक्तीतून जाणीवपूर्वक उन्माद माजविला जात आहे. यात भाजप आणि एमआयएम यांच्यात साटेलोटे झाल्याचे स्पष्ट दिसून येते, अशी टीका दलवाई यांनी केली. भारत देश सर्व भारतीयांचा आहे. यात विशिष्ट धर्माचा संबंध नाही. डॉ. अल्लामा इक्बाल यांनी भारत देशाला (मादरे वतन) ‘आई’ म्हणूनच संबोधले आहे. देशातील मातीचा प्रत्येक कण आईसारखाच वाटतो. परंतु हिंदुत्ववादी शक्तींना धार्मिक उन्माद वाढवून देशात दुही निर्माण करावयाची आहे, असा आरोप त्यांनी केला. मुस्लिम समाजाला किंवा काँग्रेसला भाजप व संघ परिवाराने देशभक्ती शिकविण्याची गरज नाही. संघ परिवाराची अभिप्रेत असलेली देशभक्ती संकुचित असून ती हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेला पोषक आहे. तर काँग्रेसला अभिप्रेत असलेली  देशभक्ती व्यापक असून सर्व भारतीयांना सामावून घेणारी व सर्वांचा विकास साधणारी आहे, अशी टिप्पणी दलवाई यांनी केली.
देशात व राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत संघ परिवाराची घुसखोरी मोठय़ा प्रमाणात झाली असून त्यातून डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास योग्यप्रकारे होत नाही, असे म्हणण्यास वाव आहे. नोकरशहातील संघ परिवाराची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी सर्वाना एकत्र यावे लागेल. संघाचा नाझीवाद देशाला घातक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासात कमकुवत पंतप्रधान आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकजण वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्ये करीत असताना मोदी त्यांना रोखू शकत नाहीत, असा एखादा प्रकार इंदिरा गांधींच्या काळात झाला असता तर त्यांनी अशा मंडळींना तत्काळ दूर ठेवले असते. मोदींपेक्षा संघाचा प्रभाव स्पष्ट होतो, अशीही टीका दलवाई यांनी केली.