छोटय़ा सराफ विक्रेत्यांचा विरोध न जुमानता कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आणखी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सराफ व्यवसायाला लागू केलेल्या अबकारी कराला विरोध करण्यासाठी देशभराबरोबर जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून दुकाने बंद आहेत. याचबरोबर विविध मार्गाने आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध केला जात आहे. या अंतर्गत शनिवारी रात्री बंद मागे घेतल्याचा चुकीचा संदेश मिळाल्याने रविवारी सराफ व्यावसायिकांत द्विधा मन:स्थिती होती. दुकान बंद करण्यावरून सराफांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यातून प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याने मतभेद विकोपाला गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातच काही व्यावसायिकानी दुकाने सुरू केली होती. ती काही वेळानंतर बंद करण्यात आली. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी सकाळी बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल यांनी मार्गदर्शन केले.