22 September 2020

News Flash

समाधी स्मारकाची शाहू महाराजांची ‘इच्छापूर्ती’ शंभर वर्षांनंतर

राजर्षी शाहू महाराज यांची स्वतच्या ‘समाधी स्मारका’ची इच्छा अखेर शंभर वर्षांनंतर पूर्णत्वास गेली आहे.

शरद पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांची स्वतच्या ‘समाधी स्मारका’ची इच्छा अखेर शंभर वर्षांनंतर पूर्णत्वास गेली आहे. या समाधीचा उद्घाटन सोहळा उद्या, रविवारी राज्यातील विविध नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

सिद्धार्थनगर भागातील नर्सरी बागेमध्ये आपले समाधी स्मारक व्हावे, अशी इच्छा शाहू महाराजांनी मृत्यूपूर्व इच्छापत्रामध्ये नमूद केली होती. गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढण्यासाठी शाहू महाराजांनी प्रवृत्त केले होते. यातून सामाजिक परिवर्तनाचे एक कृतिशील पाऊल महाराजांनी टाकले होते. त्याची उतराई म्हणून गंगाराम कांबळे यांनी महाराजांच्या पश्चात १९२६ मध्ये छोटेखानी समाधी नर्सरी बागेत बांधली होती. कालौघात स्मारक दुर्लक्षित झाले आणि नंतर त्याच्या अस्तित्वाच्या खुणाही नष्ट झाल्या.

२०१४ मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक कधी पूर्ण होणार’ अशा आशयाचे एक चित्र साकारले गेले. त्यानंतर दुर्लक्षित झालेल्या या स्मारकाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले गेले. स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीने नंतरच्या काळात आलेल्या प्रत्येक महापौरांनी यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांची अल्पकाळाची सत्ता असल्याने भरीव काही घडले नाही. अशातच तांत्रिक अडचणी येत राहिल्या.  मात्र शाहूप्रेमींचे प्रयत्न सुरू राहिले. मंदगतीने प्रवास करीत का असेना पण अखेरीस ‘समाधी स्मारक’ पूर्ण झाले आहे.

या समाधी स्मारकाचा उद्घाटन सोहळा रविवारी राष्ट्रवादी काँॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी श्रीमंत शाहू महाराज, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत.

तीन कोटी रुपये खर्च

हे स्मारक साकारण्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्मारकावर तीन टनांची मेघडंबरी आहे. चबुतरा, मेघडंबरी यांसाठी एक कोटी रुपये, संरक्षण भिंत बांधण्याकरता एक कोटी आणि अन्य कामांसाठी ७० लाख रुपये खर्च झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातही आणखी काही कामे करावयाचे असून त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

आंतरराष्ट्रीय स्मारक रखडले

कोल्हापूर संस्थानात उद्योग, व्यापाराची वाढ व्हावी, यासाठी शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नाने उद्यमनगर भागात २७ एकर जागेवर शाहू मिल बांधण्यात आली. याठिकाणी ही कापड गिरणी बंद पडल्यानंतर तेथे आधी गारमेंट पार्क आणि नंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याची घोषणा १८ डिसेंबर २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. याकामी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केली. पण त्याच्या पल्याड त्यांना भरीव काही करता आले नाही. महायुतीच्या पाच वर्षांच्या काळातही यात कसलीच भर पडली नाही. राज्य शासन, वस्त्रोद्योग महामंडळ, कोल्हापूर महापालिका अशा तिघांचा या आंतरराष्ट्रीय स्मारकास मध्ये सहभाग असूनही तिन्ही घटकांकडून याकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे.

शाहू जन्मस्थळ अपूर्ण

कोल्हापूरचे उपनगर असलेल्या कसबा बावडा येथील ‘लक्ष्मीविलास पॅलेस’ हे राजर्षी शाहू यांचे जन्मस्थळ. गतवैभव हरवलेली ही वास्तू नव्या, आकर्षक रूपात बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सहा एकर जागेत या कामाला २०११ पासून सुरुवात झाली. मात्र, आघाडी-युती अशी दोन्ही सरकारे येऊन गेली तरी हे काम रखडलेले आहे. जन्मस्थळासाठी १३ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सव्वा दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. या राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध कलाकृती साकारल्या जाणार आहे. कामाला गती असली तरी तांत्रिक अडचणी, प्रशासन -समिती सदस्य यांच्यात मतभिन्नता आहे.

राजर्षी शाहू ‘समाधी स्मारका’चे उद्घाटन होत आहे, ही कोल्हापूरकरांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आता लोकराजा शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि शाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक या कामांना गती देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे करेल.

– सतेज पाटील, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 2:00 am

Web Title: shahu maharaj shahu samadhi sthal inaugurated tomorrow by sharad pawar zws 70
Next Stories
1 कोल्हापुरात आजी-माजी मंत्र्यांमध्ये वादाच्या ठिणग्या
2 सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना धक्का
3 गरोदर नवविवाहितेचा पतीकडून खून
Just Now!
X