औद्योगिक सांडपाणी आणि गटारीच्या पाण्याच्या वाढत्या समस्येने प्रशासन हैराण झाले असताना या वाया जाणाऱ्या घटकापासून वीज, विटा व शुद्ध पाणी यांची निर्मिती करणारा ६० कोटी रुपयांचा प्रकल्प शासन व बिल गेटस् फौंडेशन यांच्यावतीने इचलकरंजी शहरात राबविण्यात येणार आहे. त्यापकी ३० कोटी रुपये अमेरिकास्थित बिल गेटस् फौंडेशनकडून मिळणार आहेत.
औद्योगिक सांडपाणी आणि गटारीच्या पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पापासून तयार होणाऱ्या स्लज ( गाळ ) पासून  साकारणाऱ्या या प्रकल्पाच्या खर्चाचा बोजा नगरपालिकेवर पडणार नाही. उलट त्यापासून उत्पादित होणारी ५०० किलोवॅट वीज नगरपालिकेलाच वापरता येईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ व बिल गेटस् फौंडेशनचे प्रतिनिधी सुभाष नियोगी यांनी दिली.
इचलकरंजी शहरात असलेल्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यापासून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) असून, त्यापासून दररोज सुमारे १२ टन गाळ (स्लज) मिळतो. तसेच गटारीच्या सांडपाण्यापासून प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पातून १२ टन असा एकूण २४ टन गाळ मिळतो. हा गाळ ओला असल्यामुळे त्यावर संयंत्रामार्फत प्रक्रिया केल्यास त्यापासून होणाऱ्या वाफेपासून दररोज ५०० किलो वॅट वीज तयार होईल. तसेच ३५ हजार लिटर शुद्ध पाणी मिळेल. याशिवाय राहिलेल्या राखेपासून बांधकामासाठी उपयुक्त विटा मिळतील. असा हा प्रकल्प उभारणीसाठी सुमारे एक एकर जागा लागणार असून, त्याला ६० कोटी रुपये खर्च येणार आहे.
हा प्रकल्प राबविण्यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली पाहिजे आणि हा प्रकल्प शासनामार्फत बिल गेटस् फौंडेशनकडे पाठविला पाहिजे.
देशभरातील एकमेव प्रकल्प
शहरातील सांडपाण्यापासून वीज, शुद्ध पाणी व बांधकामाच्या विटा तयार करणारा प्रकल्प सेनेगल (अफ्रिका) येथे बिल गेटस् फौंडेशनने अशा प्रकारचा उभा केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, तो उत्तमरीत्या सुरू आहे. इचलकरंजीमध्ये हा प्रकल्प राबविण्यासाठी प्राथमिक स्तरावर बोलणी झाली असून, फौंडेशनने या प्रकल्पास तत्त्वत: मान्यता दिली आहे, असा हा प्रकल्प इचलकरंजीमध्ये राबविला गेल्यास तो भारतातील पहिलाच प्रकल्प असेल.