शेतकरी संघटनेची मागणी

ऊस गळीत हंगामात ऊस दर कडाडण्याची चिन्हे असताना शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी यंदाच्या हंगामात उसाची कमतरता व साखरेला मिळत असलेला चांगला भाव पाहता पहिली उचल ३५०० रुपये द्यावी, अशी मागणी करीत दराच्या कोंडीला वाचा फोडली. यंदा इतकी उचल घेतल्याशिवाय धुराडे पेटू देणार नाही. ओतूर येथील ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगत पाटील यांनी आक्रमक इरादा पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या जिवावर मोठी झालेली मंडळीच सत्तेसाठी गप्प राहिल्याने आता वाली कोण राहिला नसल्याची भावना तयार होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत त्यांनी खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख न करता टीका करत आता शेतकऱ्यांच्या मुलांनीच शेतीचे प्रश्न हाती घेऊन उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.

राज्यात शेतकरी अडचणीत सापडला असताना राज्यकत्रे मात्र अजूनही अच्छे दिनचे गाजर दाखवण्याचे काम करीत आहेत, असे सांगून त्यांनी सत्ताधाऱ्यांना टीकेचे निशाण बनवले. ते म्हणाले, दोन्ही कॉँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून शेतकऱ्यांनी या मंडळींच्या हातात सत्ता दिली. ‘फोडा आणि झोडा’ ही सरकारची जुनी रणनीती आहे. तिला आतापर्यंत अनिल गोटे, पाशा पटेल, राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे बळी पडले. शेतकरी नेत्यांना सत्ता देऊन चळवळ कमकुवत करण्याचे कारस्थान सुरू आहे; पण शेतकऱ्यांची कूस वांझ नाही, याचे भान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवावे, अशी टीका त्यांनी केली.

सध्याच्या सरकारचे साखर कारखानदारांना सांभाळण्याचे धोरण आहे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांनाच विरोधकाची भूमिका पार पाडणारे आहेत.

बाजारपेठेत एकही वस्तूचा दर तीन वष्रे स्थिर नसताना गेली तीन वष्रे एफआरपी एकच ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. कांद्याची निर्यातबंदी करून कांदा उत्पादकांना देशोधडीला लावले आहे. दूध उत्पादक तर आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.  अ‍ॅड. माणिक िशदे, अ‍ॅड. अजित पाटील, दादूमामा कामिरे, गुणाजी शेलार उपस्थित होते