‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या कोल्हापूर विभागीय अंतिम फेरीतून सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सुजित श्रीमंत काळंगे याने महाअंतिम फेरी गाठली आहे. मंगळवारी कोल्हापुरात या विभागीय अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. येत्या १७ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत सुजित कोल्हापूर केंद्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष आहे. या वर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्य़ांमधील स्पर्धक गेल्या मंगळवारी येथे आयोजित प्राथमिक फेरीत सहभागी झाले. प्राथमिक फेरीतून ९ स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. आज अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धक सहभागी झाले होते. ‘गलीबॉय’चे भवितव्य,‘पुढारलेल्यांचे आरक्षण’,‘खेळातील परके शेजारी’, ‘लक्ष्यभेद-नवा पर्याय’ हे विषय होते. सांप्रतकाळाचे ज्वलंत विषय स्पर्धेसाठी असतानाही विद्यार्थ्यांनी कसून तयारी केली होती. परीक्षकांसह रसिक श्रोत्यांनी देखील स्पर्धकांच्या मांडणी-सादरीकरणावर पसंतीची मोहोर उमटवली. विभागीय अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. शिवाजी जाधव व डॉ. जुई कुलकर्णी यांनी काम पाहिले.

येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या विभागीय अंतिम स्पर्धेत सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सुजित श्रीमंत काळंगे पहिला क्रमांक पटकावत महाअंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला, तर अजय संजय पोर्लेकर (गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर) याला दुसरा आणि अक्षय अरविंद पाटील (विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा, सांगली) याला तिसरा क्रमांक मिळाला. प्रदीप बाळू चौधरी (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर) व हर्षवर्धन चंद्रकांत आलासे (शांतिनिकेतन महाविद्यलय, सांगली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. परीक्षक डॉ. जुई कुलकर्णी, प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. वितरण विभागाचे वितरण व्यवस्थापक दीपक क्षीरसागर, संदीप गिरी, सर्जेराव काटीवाले उपस्थित होते.

निकाल याप्रमाणे

* प्रथम – सुजित श्रीमंत काळंगे — छत्रपति शिवाजी महाविद्यालय, सातारा

* द्वितीय- अजय संजय पोर्लेकर — गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर

* तृतीय -अक्षय अरविंद पाटील — विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा, सांगली

* उत्तेजनार्थ प्रथम – प्रदीप बाळू चौधरी – राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर

* उत्तेजनार्थ द्वितीय – हर्षवर्धन चंद्रकांत आलासे – शांतिनिकेतन महाविद्यालय, सांगली

प्रायोजक

पितांबरी कंठवटी प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लिमिटेड, तर पावर्ड बाय पार्टनर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन्स लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.