दयानंद लिपारे

गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रथमच पक्षीय माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न या वेळी होत आहे. महाविकास आघाडीला मूर्तस्वरूप येण्यापूर्वीच काहींनी पाठ फिरवल्यामुळे आघाडी स्वरूपात निवडणूक लढविण्याच्या संकल्पनेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यावर मात करून बड्या नेत्यांचे आघाडीतील नाराजांना एकसंध ठेवण्याचे प्रयत्न आहेत, तर सत्तारूढ गटाने पक्ष नेहमीप्रमाणे पक्षविरहित निवडणूक लढवताना बेरजेच्या राजकारणावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळची (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) निवडणूक आजवर गटातटांमध्ये लढली गेली. आमदार पी.एन. पाटील, महादेवराव महाडिक, अरुण नरके यांच्या सत्तारूढ आघाडीला गेल्या निवडणुकीत विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला होता. आता या गटाला सत्तेत येण्याची आशा वाटू लागली आहे. यासाठी अधिकाधिक लोक सोबत असावेत यासाठी पक्षीय चेहरा निर्माण करण्यात आला आहे. किंबहुना प्रथमच पक्षीय पातळीवर निवडणूक ‘महा विकास आघाडी’च्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांतील नेत्यांना एका झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातून गतवेळी विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेच आघाडीची धुरा सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी अन्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

आघाडीत तिढा

मात्र महा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असताना त्यात अचानक जनसुराज्य शक्ती पक्षाचा प्रवेश झाला. माजी मंत्री, आमदार विनय कोरे यांनी महा विकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. राज्यपातळीवर भाजपला पाठिंबा, पण स्थानिक मुद्द्यावर आघाडीसोबत नाही, अशी त्यांची व्यस्त भूमिका राहिली. त्यानंतर मतदारसंघातील शिवसेनेचे प्रतिस्पर्धी माजी आमदार सत्यजित पाटील हे नाराज झाले. त्यांनी आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका बदलली. भाजपला पाठिंबा देणारे महा विकास आघाडीसोबत कसे येऊ शकतात? असे म्हणत ही निवडणूक पक्ष पातळीवर होत नाही, असा विचार मांडत त्यांनी पुन्हा सत्तारूढ गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांची नाराजी उफाळून आली. त्यांनी दोन संचालकांच्या जागा हव्यात, असा आग्रह धरत मतदारसंघातील प्रतिस्पर्धी माजी आमदार के. पी. पाटील तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे यांची कोंडी केली. त्यांची नाराजी अद्यापही दूर झालेली नसल्यामुळे आघाडीच्या एकसंधतेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनीही बंडाचा झेंडा उगारला होता, पण त्यांची समजूत काढण्यात आली, ही विरोधकांची जमेची बाजू ठरली.

महाविकास आघाडीच्या झेंडाखाली निवडणूक लढवत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोकुळ संस्था काँग्रेसकडे राहिली पाहिजे, असा संदेश जिल्ह््यातील नेत्यांना एका बैठकीत दिला. मात्र पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सत्तारूढ गटाचे नेते पी. एन. पाटील यांनी हा निर्णय मनावर घेतला नाही. त्यांनी सत्ताधारी गटाचे नेतृत्व करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. सहकाराची निवडणूक पक्ष पातळीवर होत नसते. सहकारात राजकारण आणले जात नाही, अशी त्यांची धारणा असल्याने काँग्रेस एकसंध नसल्याचे दिसले. अद्याप ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, पदवीधर मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगावकर या काँग्रेसच्या तिन्ही आमदारांनी पहिल्या टप्प्यात तरी सक्रिय भूमिका घेतल्याचे दिसत नाही. ते यथावकाश सक्रिय होतील, असे सांगितले जात आहे.

सत्तारूढ गटाची चाचपणी

जिल्ह््यातील बडे नेते महा विकास आघाडीच्या छावणीत गेल्याने आणि पाच संचालकांनी गटाला रामराम ठोकल्याने सलामीलाच सत्तारूढ  गट अडचणीत आल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत किल्ला लढवण्यासाठी या गटाच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कालपर्यंत चर्चेची सूत्रे पी. एन. पाटील यांच्याकडे होती, पण आता मात्र महादेवराव महाडिक यांनी गोकुळ या एकमेव संस्थेवरील आपली पकड ढिली होऊ नये यासाठी सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यांनी काल माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानीच्या शिवारात घुसून राजू शेट्टी यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अलीकडे शेट्टी हे महा विकास आघाडीवरही नाराज आहेत. ते सत्तारूढ गटाकडे गेले तर महाविकास आघाडीच्या समोर पुन्हा प्रश्नचिन्ह लागणार आहे.