करोनाच्या कठीण काळातही महाविकास आघाडीचे सरकार इतर राज्यांपेक्षा चांगले काम करत असताना विनाकारण कोणतेही मुद्दे काढून राज्य सरकार आणि गृह विभागाची अब्रू काढली जात आहे. प्रत्येक गोष्टीत सरकारला उघडे पाडण्याचं राजकारण करून जाणीवपूर्वक राज्य सरकारला उचकवण्याच काम भाजपाचे नेते मंडळी करत असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

मुश्रीफ म्हणाले, “सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण तसेच अंमली पदार्थांचा आरोप असे मुद्दे पुढे करून जाणीवपूर्वक भाजपाकडून राज्य सरकार आणि गृह खात्याची अब्रू काढण्याच राजकारण करण्यात येत आहे.” फडणवीस सरकारच्या काळात राज्यात कितपत कायदा आणि सुव्यवस्था होती याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. नागपूरमध्ये करोना रुग्णांचा आकडा ५० हजारांवर गेला असल्याने फडणवीस यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान सोडून जरा नागपूरमधून जाऊन वस्तुस्थिती पाहावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मराठा आरक्षणप्रकरणी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी फडणवीस सरकारने जे वकील नियुक्त केले होते तेच वकील महाविकास आघाडी सरकारने कायम ठेवले आहेत, मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीचे सरकार शेवटपर्यंत लढेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.