कोल्हापूर : येथे उपचार घेणाऱ्या ६३ वर्षीय महिलेचा करोनाबाबतचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. करोना बाधित रुग्णाची संख्या कोल्हापुरात तीन झाली असून सायंकाळ नंतर शहरातील काही भागात सीमा सीलबंद करण्याचा निर्णय करवीर उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

कसबा बावडा येथे राहणारी ही महिला २० मार्च रोजी सातारा येथे तर २२ ते २८ मार्च कालावधीत कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. २९ मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तिला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे ३० मार्चला दिसून आली. ३१ मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. ३ एप्रिल रोजी बावडय़ातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी जिल्हा रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये दाखल करून तिच्या घशाच्या स्रावाचा नमुना (स्वॅब) घेण्यात आला. याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

रस्त्यांच्या सीमा बंद

करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. करवीर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी एक परिपत्रक जरी केले. त्यानुसार कसबा  बावडा येथील मराठा कॉलनी परिसरात जाणाऱ्या सर्व बाजूच्या रस्त्यांच्या सीमा सीलबंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

अलगीकरणानंतर १८ जण घरी

येथील शेंडापार्कमधील संस्थात्मक अलगीकरण केंद्रातून १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना सोमवारी त्यांच्या घरी पाठवण्यात आले. महापालिकेच्यावतीने या ठिकाणी पुरविलेल्या सुविधांबाबत घरी परतणाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे व्यक्तिश: आभार मानले.   शासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर महापालिकेने करोना संशयित लोकांसाठी  शेंडापार्क येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरु केले आहे. येथे दाखल होणाऱ्या लोकांच्या आरोग्य, निवास, भोजनाची व्यवस्था केली जाते. अलगीकरणातील १४ दिवसांचा आपला कालावधी पूर्ण करणाऱ्या १८ जणांना आज घरी जाण्यास अनुमती देण्यात आली.  आयुक्त कलशेट्टी यांनी आज अलगीकरण केंद्राला भेट देऊन नूतनीकरण आणि सुविधांची पाहणी केली. यावेळी १८ जनांनी त्यांचे उत्तम सुविधेबद्दल आभार मानले. डॉ. कलशेट्टी यांनी त्यांना  घरी परतल्यानंतरही पुढील काही दिवस स्वत:सह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी सांगितले.