कोल्हापूर : येथील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलंने त्यांच्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आल्याने गुरुवारी आरोग्य घनकचरा विभागामार्फत ५० हजार रुपये दंड करण्यात आला. ही कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, मुकादम राकेश पाटोळे व खलिद शेख यांनी केली.
महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना जाहीर नोटीसद्वारे वैद्यकीय आस्थापनेतून (हॉस्पिटल, क्लिनिक व लॅब) मध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा इतरत्र कोठेही न टाकता कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वाहनाकडेच देण्याबाबत आवाहन केले होते. यामध्ये आस्थापनेने जैव वैद्यकीय कचरा आजूबाजूच्या परिसरात टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या होत्या.
गुरुवार, ३० मे रोजी ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांनी त्यांच्या आस्थापनेमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आल्याने त्यांना ५० हजार रुपये इतका दंड करण्यात आला.
हेही वाचा – संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची शिरोळ, इचलकरंजीत पाहणी
तरी कोल्हापूर शहरातील व शहराबाहेरील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात येत की, सर्व वैद्यकीय व्यवसायिकांनी त्यांच्या आस्थापनामध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा कोल्हापूर महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या वाहनांकडेच द्यायचा आहे अन्यथा सदरचा कचरा इतरत्र उघडयावर, नाल्यामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व नियंत्रण अधिनियम तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.