कोल्हापूर : आजवर ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा शब्द ऐकला होता. पण भारताचे पाकिस्तान विरोधात यशस्वी कामगिरी मोहीम राबवल्यानंतर नाना शंका उपस्थित करणारा ‘पाकव्याप्त काँग्रेस’ हा नवा धोका देशासमोर निर्माण झाला आहे. भारतीय सैन्याने दमदार कामगिरी केली असतानाही यांच्या डोक्यात पाकिस्तानचा विषाणू घुसला आहे. तो त्यांच्या डोक्यातील ‘हार्डडिस्क’ खराब करीत आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इचलकरंजी येथे केली.
इचलकरंजी येथे भाजपचा मेळावा आणि आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून ७०० कोटी रुपये कामाचा शुभारंभ, लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात निर्माण केलेली शस्त्रास्त्रे युद्धात अत्यंत उपयुक्त ठरली, असा गौरवपूर्ण उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमचे आमदार राहुल आवाडे हे अडीच किलोमीटरचा तिरंगा ध्वज घेऊन आनंदाने मिरवणूक काढत आहेत. पण दुसरे राहुल (गांधी) हे पाकिस्तानची किती विमाने पाडली, कोठे हल्ला झाला? असे प्रश्न उपस्थित करत आहेत. एकाने तर पाकिस्तान चिनी बनावटीची १५ हजार रुपयाची ड्रोन वापरत असताना भारत १५०० रुपयांचे ड्रोन युद्धासाठी कसे वापरत आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. युद्धात वापरायचे आणि शेतीत वापरायचे ड्रोन यात फरक असल्याचे यांना कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.
भाजपचा महापौर करणार
आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्थानिक प्रश्नांची मागणी करताना आगामी निवडणुकीत इचलकरंजीत भाजपचाच महापौर करू, असे ठामपणे सांगितले.
महापुरातून दुष्काळमुक्ती
सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण होत असल्याने जागतिक बँकेच्या माध्यमातून ३२०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प राबवला जात आहे. या कामाची निविदा १५ दिवसांत प्रसिद्ध होईल, असे आश्वस्त करून फडणवीस म्हणाले, राज्यात तब्बल १५० टीएमसी पाणी हे समुद्रात मिसळते. यातील निम्मे जरी पाणी वळवले तरी अर्ध्या महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होईल. महापूरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला राज्य सरकारचा विरोध आहे. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जावू. शिवाय पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याचा प्रकल्प झाल्यास अलमट्टीचा धोकाच उरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.