कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेपाठोपाठ आता शिरोळ तालुक्यातही कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्रातूनही दूधगंगा नदीतून पिण्याचे पाणी देण्याची मागणी होऊ लागली आहे. यामुळे पाणी वाटपाच्या वादात नवी भर पडली आहे.

कृष्णा नदीचे पाणी घेऊन पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या इचलकरंजीकरांना दूधगंगेतून पाणी देत असाल तर पंचगंगेचे प्रदूषित पाणी पिणाऱ्या आम्हा कुरुंदवाडकरांनाही दूधगंगेचे दतवाड येथून दूधगंगा पाणीपुरवठा योजना करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-कोल्हापुरातील कुख्यात केदार टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता

पंचगंगा नदी ही उगमापासून ते संगमापर्यंत काही वर्षांपूर्वी स्वच्छ, निर्मळपणे वाहत होती. इचलकरंजी शहरातील औद्योगिक आणि रासायनिक पाण्यामुळे ती गटारगंगा बनली आहे. हे प्रदूषित पाणी संगमाजवळ कृष्णा नदीत मिसळते. या ठिकाणीच कुरुंदवाड शहराची सव्वाशे वर्षांपूर्वीची पाणी उपसा योजना असल्याने हे प्रदूषित पाणी कुरुंदवाडकरांना प्यावे लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर म्हणाले, इचलकरंजीसाठी दूधगंगा नदीतून ही पाण्याची मागणी केली आहे. मात्र आता हे शहर कृष्णा आणि दूधगंगा या दोन नद्यांचे पाणी घेऊन दुप्पट प्रदूषित पाणी पंचगंगेत सोडून आम्हावर पुन्हा अन्याय करीत आहे. तर राजू आवळे, सुहास पासोबा यांनी, “कुरुंदवाड शहराची एक पाणी योजना रखडली आहे.निदान दूधगंगा पाणी योजनेची नवीन प्रक्रिया करून नवा ठेकेदार नेमून पाणी योजना मंजूर करावी” अशी मागणी केली.