कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विधानसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी योग्य वेळी गुपिते उलगडणार असल्याचे जाहीर केले. कागल वगळता इतरत्र पक्षाचे अस्तित्व धूसर होत चालले आहे. हक्काचे मतदारसंघ गमावले असताना नव्याने कोणी पक्षात आलेले, येवू पाहणारे विधानसभेपर्यंत झेप घेण्याच्या योग्यतेचे आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्या कोल्हापूरच्या ताज्या दौऱ्यात काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल व राजेश यांनी हातावर घड्याळ बांधले. यामुळे राष्ट्रवादीला करवीर, राधानगरी तालुक्यात बळ मिळाल्याचा दावा केला जात आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकी वेळी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती शाहू महाराज यांना ७० हजाराहून अधिक मताधिक्य मिळालेले होते. त्यानंतर पी. एन. पाटील यांचे अकाली निधन झाल्याने विधानसभा निवडणुकी वेळी सहानुभूतीचे वातावरण होते. परंतु, या परिस्थितीचा फायदा त्यांचे सुपुत्र राहुल यांना उठवता आला नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी त्यांचा दारुण पराभव केला. पी. एन. पाटील व त्यांचे सुपुत्र राहुल यांच्यावर या दोघांवर मात करण्याची कामगिरी नरके यांनी केल्याने करवीर मतदारसंघात काँग्रेसवर सिंह आणि गड दोन्ही गमावण्याची वेळ आली.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे कोल्हापुरात आले. त्यांनी दिवंगत पी. एन. पाटील यांच्या घरी जाऊन सांत्वन करणे अपेक्षित होते. ते केले नसल्याचा मुद्दा घेऊन पाटील यांच्या दोन्ही पुत्रांनी काँग्रेसचा त्याग करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
चंद्रदीप नरके यांच्या विरोधातील राजकीय लढाई सुरूच राहणार असल्याचे राहुल पाटील यांनी जाहीरपणे म्हटले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुती अंतर्गत एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उघडपणे राजकीय संघर्ष रंगणार हे स्पष्ट झाले आहे. चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले बलाढ्य पी. एन. पाटील यांनाही दोनदा पराभूत केले होते. त्यांचा मतदारसंघावर प्रभाव कायम आहे. या तुलनेत नरके यांना अनुनभवी राहुल पाटील यांच्याशी सामना करणे आणखी सोपे जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी योग्य वेळी पत्ते खोलणार असल्याचे म्हटले आहे. पक्ष वाढीसाठी नेमके गुपित काय असणार हे त्यांनी उघड केलेले नाही. कागल मध्ये हसन मुश्रीफ वगळता दिवसेंदिवस पक्षाची ताकद खालावत चालल्याचे प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे निकाल दर्शवत आहेत. चंदगड मतदारसंघातील आमदार गेल्यावेळी पराभूत झाले. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घड्याळाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क वाढवला आहे. राधानगरी – भुदरगड मध्ये के. पी. पाटील – ए. वाय. पाटील या मेव्हण्या – पाहुण्यांच्या संघर्षात पक्षाची हानी होत राहिली. इतर मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व शोधावे अशी दुर्दशा आहे. ही अवनती का होत चालली आहे याचे चिंतन ना अजितदादांनी केले ना पक्षाचा एकमेव चेहरा असलेले हसन मुश्रीफ यांनी. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा बोलून दाखवली केली. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातच आमदारांची संख्याबळ वाढणार नसेल तर दादांना मुख्यमंत्र्यांची पदाची खुर्ची मिळणार तरी कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.