दयानंद लिपारे

कोल्हापूर : केंद्र व राज्याच्या सत्तेत असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते एका राजकीय व्यासपीठावर येऊ लागले असताना दुसरीकडे त्यांनी विकासकामासाठीही हे आग्रही असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील संजय मंडलिक, धनंजय महाडिक व धैर्यशील माने या तिन्ही खासदारांनी दिल्ली दरबारी विकासकामांची मोट बांधली आहे, तर भाजपला पाठिंबा दिलेले प्रकाश आवाडे व विनय कोरे हे अपक्ष आमदार विकासकामासाठी एकत्रित प्रयत्न करताना दिसू लागले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील खासदारांमध्ये यापूर्वी सख्य दिसत नव्हते. किंबहुना आजी-माजी खासदारांमध्ये हा संघर्ष गाजला होता. विशेषत: संजय मंडलिक- धनंजय महाडिक यांच्यामध्ये राजकीय सामना होत असताना विकासकामाच्या श्रेयवादावरूनही एकमेकांवर जोरदार प्रहार करण्यात आले होते. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांत एकदा धनंजय महाडिक, तर दुसऱ्यांदा संजय मंडलिक यांनी विजय मिळवताना एकमेकांना पराभूत केले होते.

धनंजय महाडिक व संजय मंडलिक यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला. तथापि, विमानतळ, रेल्वे, रस्ते या कामांचे श्रेय कोणाचे यावरून त्यांच्यात खरमरीत वाक्युद्ध रंगल्याचे कोल्हापूरकरांनी अनेकदा पाहिले आहे. यावरून दोघांतील राजकीय संघर्ष वाढत गेला होता.

राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर वाऱ्याची दिशा बदलताना दिसत आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यात तीन खासदार आहेत. विशेष म्हणजे तिघेही केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे आहेत. साहजिकच सत्तेचा फायदा घेत त्यांनी तिघांनीही रेल्वे, विमानतळ, कामगार विमा, राष्ट्रीय महामार्ग आदी प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा सुरू केला आहे. यापूर्वीचा वैरभाव विसरून तिघे विविध खात्यांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे हातात हात घालून पाठपुरावा करत आहेत. एकमेकांच्या कामासाठी निवेदन देऊन मदतसुद्धा केली जात आहे. राज्य कामगार विमा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार धैर्यशील माने, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक यांच्या उपस्थितीतच खासदार संजय मंडलिक यांनी तिघे खासदार दिल्ली दरबारी एकमुखाने कसे काम करत आहेत याचा सविस्तर तपशील कथन केला होता. आजवर विरुद्ध दिशेला तोंड असणारे नेते राजधानीत का असेना, पण एका माळेत गुंफलेले असल्याचे पाहून उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात प्रतिसाद दिला.

आमदारांची साथ

तर इकडे, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अपक्ष आमदारांमध्येही विकासकामासाठी एकत्रित आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे व जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे दोघेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. असे असतानाही गेल्या आठवडय़ात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे इचलकरंजी महापालिकेतील शास्ती रद्द करण्याच्या प्रकरणाचा प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला. तेव्हा विनय कोरे, खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थिती लावून सहकार्य केले. हातकणगले तालुक्यातील उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कसाठी धैर्यशील माने- प्रकाश आवाडे यांनी विविध गावांतील जागांची पाहणी संयुक्तपणे केली. अर्थात, काही बाबतीत या सर्व नेत्यांमध्ये आंतरिक पातळीवर काहीशा कुरबुरी निश्चितपणे असल्या तरी विकासाच्या मुद्दय़ावर एकत्र आल्याचे चित्रही कोल्हापूरकरांना सुखावणारे ठरले आहे. तथापि, हे ऐक्य आगामी निवडणुकीच्या वेळी कसे राहणार याची उत्सुकता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. केंद्र शासन त्यासाठी मदत करण्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे धनंजय महाडिक, धैर्यशील माने व मी असे संयुक्तपणे कामांचा पाठपुरावा करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात विकासाला गती आली आहे.

– संजय मंडलिक, खासदार