राज्यातील रिक्षा, टेम्पोसह इतर वाहनांची परवाना नूतनीकरणात झालेली ५० ते १०० पट वाढ अखेर रद्द होणार असून, याबाबतचे प्रारूप परिपत्रक परिवहन विभागाने मोटार वाहन विभागाला पाठवले असून हरकती मागविल्या आहेत. याबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याकडे २४ मे रोजी बठक घेऊन या विषयाला गती दिली होती.
इचलकरंजीतील रिक्षा व टेम्पोचालकांनी हाळवणकर यांच्याकडे सदर दरवाढीबाबत निवेदन देऊन दरवाढ रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यावर हाळवणकर यांनी परिवहन राज्यमंत्री देशमुख यांच्याकडे मंत्रालयात बठकीचे आयोजन केले होते. बठकीत वाहनाचा वाढलेला विमा रक्कम कमी करावा, रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागण्यासुद्धा मांडल्या.
त्यावर राज्यमंत्री यांनी अधिसूचनेबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन ती लवकरात लवकर निर्गमित करण्याचे आदेश दिले. तसेच या बाबतचा अहवाल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना सादर करून पाठपुरावा केला. त्यावर दिनांक ८ जून रोजी सुधारित दराची अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून, कोल्हापूर येथील परिवहन कार्यालयास प्राप्त झाली आहे. या प्रारूप अधिसूचनेत प्रतिमहिना ५००० रुपये आकारला जाणारा दंड प्रति दोन महिन्याला २०० रुपये इतका करण्यात आलेला आहे. तसेच जितका वेळ होईल, तेवढी दंडाच्या रकमेत वाढ होणार आहे. ही सुधारणा सर्व संघटनांनी मान्य केली आहे.
इचलकरंजीचे संस्थापक स्मारक
इचलकरंजीचे संस्थापक श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांचे यथोचित स्मारक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. घोरपडे यांचे वंशज यशवंतराव आबासाहेब घोरपडे (जहागीरदार), त्यांच्या पत्नी मिता घोरपडे यांच्या समवेत हाळवणकर यांनी पंचगंगा नदीतीरावरील ना. बा. घोरपडे यांच्या समाधिस्थळाची पाहणी केली. इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगासाठी आज जगात नावारूपाला आले आहे. बँका, पतपेढय़ांच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या संस्थापकांचे शहरात यथोचित स्मारक नाही. शहरात बाहेरहून येणाऱ्या पर्यटक, उद्योजक, व्यापारी यांना संस्थापकांबद्दल माहिती व्हावी, यासाठी असे स्मारक गरजेचे आहे, अशी अपेक्षा या वेळी यशवंतराव घोरपडे यांनी व्यक्त केली.