कोल्हापूर : मी जिंकावं यासाठी अशोक सराफ पत्त्यांचा डाव हरायचे. यातून त्यांच्या मनाचे मोठेपण दिसून येते, अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करीत असलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर सभेतून शुभेच्छा व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापुरुषांच्या पुतळा अनावरण करण्यासाठी नाना पाटेकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी झालेल्या समारंभात पाटेकर यांनी मनोगतात अशोक सराफ यांच्या यांची आठवण काढली.

  आज अशोक सराफ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तेथे हवे होतो. असा उल्लेख नाना पाटेकर यांनी केला.अशोक मामांनी माझ्यासाठी खूप काही केले, असे सांगत पाटेकर यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, त्या काळात आम्ही नाटक करीत असू. त्यांना मानधनाचेचे तीनशे रुपये मिळायचे. तर मला पन्नास रुपये. नाटक संपल्यानंतर फावल्या वेळेत आम्ही पत्त्याचा डाव मांडत असू. तेव्हा अशोक सराफ डाव हरत असतं. मला त्यातून पैसे मिळावे असा त्यांचा उद्देश असायचा. नंतर मी त्यांचे डोके, पाय चेपून देत होतो, असे म्हणत या ज्येष्ठ कलाकारांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचाही पाटेकर यांनी नम्रतापूर्वक उल्लेख केला.