कोल्हापूर : दोन माजी आमदारांच्या वादामुळे दोन महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या भाजपाच्या इचलकरंजी महानगर विधानसभा मंडलच्या निवडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी जाहीर केल्या. ग्रामीण अध्यक्षपदी बाळासाहेब वाल्मिक माने, शहर पूर्व अध्यक्षपदी श्रीरंग शिवाजी खवरे आणि शहर पश्चिम अध्यक्षपदी शशिकांत बाबुराव मोहिते यांची वर्णी लागली आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तीन मंडलच्या या तीन अध्यक्षपदाची नावे निश्चित करण्यात आली होती. परंतु, माजी मंत्री प्रकाश आवाडे व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर या माजी आमदारांच्या संघर्षातून या निवडी रखडल्या होत्या.
सरशी आणि संघर्ष
पूर्व अध्यक्षपदाचे नाव कोणते निश्चित करायचे हा कळीचा मुद्दा बनला होता. या ठिकाणी हाळवणकर यांनी माजी नगरसेवक किसन शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. तर आवाडे यांनी खवरे यांची निवड झाली पाहिजे हा मुद्दा ताणून धरला होता. त्यामध्ये आता आवाडे यांची सरशी झाल्याचे दिसत आहे. यामुळे नाराज झालेले हाळवणकर हे आता कोणता पवित्रा घेणार याकडे लक्ष वेधले आहे.