बहुसदस्य प्रभागाची रचना करून राज्यातील नगरपालिकांवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सत्तारूढ भाजपकडून सुरू आहे. सहजपणे सत्ता मिळण्याची शक्यता नसल्याने अशी आडवाट धुंडाळली जात असली, तरी या निवडणुका भाजपाला जिंकता येणार नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  पेठवडगाव येथे बोलताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेठवडगावचे ३२ वष्रे नगराध्यक्ष असलेले स्वर्गीय विजयसिंह यादव पूर्णाकृती पुतळा अनावरण चव्हाण यांच्या हस्ते एसटी स्टँडजवळ झाले. या चौकाला विजयसिंह यादव चौक असे नाव देण्यात आले. या वेळी  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या राज्याला प्रामुख्याने पाणी आणि नागरीकरण हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. नागरीकरणाच्या बाबतीत  स्वर्गीय विजयसिंह  यांच्यासारखे चांगले काम अन्य कोणी महाराष्ट्रात केलेले नाही. त्यांच्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या कन्या, नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी जपला असून त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी  केले.

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ३२ वष्रे नगराध्यक्ष असताना विजयसिंह यादव यांनी सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडली आहे. नगराध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, यादव यांना वडगावच्या जनतेने मोठी ताकत दिली. येणारे प्रत्येक आव्हान हसतमुखाने पेलले. त्यांचे हे कार्य पुढे चालविण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. आमदार सुजित मिणचेकर यांनी प्रास्ताविक केले. पतंगराव कदम, सतेज पाटील, विनय कोरे या माजी मंत्र्यांचे भाषण झाले. माजी नगरसेवक सुनील हुकेरी यांनी आभार मानले. या वेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी आमदार यशवंत पाटील, उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी, राजन शेटे, मुख्याधिकारी अतुल पाटील, संपत नायकवडी, आदींसह आजी-माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp multi member ward system in kolhapur
First published on: 26-07-2016 at 01:56 IST