कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे नेते सुरेशदादा पाटील यांची नाराजी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दूर केली आहे. आता त्यांच्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता देण्याचा निर्णय भाजपने केला आहे. याबाबतचे पत्र उपमुख्यमंत्री , भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी आगामी काळात महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला योग्य न्याय देण्यात येईल असे वरिष्ठांनी सांगितले असल्याचे सुरेशदादा पाटील यांनी सांगितले. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. तसेच महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने आपली ताकद असलेल्या ठिकाणी भाजपाला साथ देत अधिकाधिक जागा मिळण्यासाठी सहकार्य केले होते. तर चालू लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने उतरण्याची तयारी केली होती.

हेही वाचा…कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

मात्र भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी दिलेल्या पत्रात, महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या सहमतीने, यापुढील काळात महायुतीतील घटक पक्ष म्हणून आपला सहभाग नोंदवण्यात आला आहे. आपण महायुतीचे घटक पक्ष आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे महायुतीचा ‘महाविजय २०२४’ साकार करण्यासाठी आपण सारे काम करूया, असे पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा…कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

त्यानुसार सुरेशदादा पाटील यांनी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाच्या राज्य, जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यभरातील महायुतीचे उमेदवार निवडून आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आदेश दिले आहेत.