दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या यशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. माजी मंत्री, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजप म्हणून आगामी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भाजप, भाजप आणि भाजप’ असा जप त्यांनी सुरू ठेवला आहे. राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रातील मातब्बर मानले जाणारे आवाडे घराणे भाजपशी जोडले जात असल्याने जिल्ह्यातील भाजपचे बळ वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभा आणि पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत भाजपची सरशी झाली. पहिल्या निवडणुकीत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यानंतर भाजपने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. बदलता राजकीय प्रवाह लक्षात घेऊन अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला केवळ पाठिंबा न देता भाजपच्या झेंडय़ाखाली निवडणुका लढण्याची नवी भूमिका घेतली आहे.

काँग्रेस, अपक्ष ते भाजप

प्रकाश आवाडे यांनी पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून ते दोन वेळा मंत्रीही होते. सर्वाधिक ऊस गाळप करणारा जवाहर साखर कारखाना, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आवाडे इचलकरंजी बहुराज्य शेडुल्ड सहकारी बँक, प्रोसेसर्स, टेक्साइल पार्क, मेगा पॉवरलूम प्रकल्प आदी विविध सहकारी संस्था, डीकेटीई शिक्षण संस्था यावर प्रकाश आवाडे यांचे नेतृत्व आहे. त्यांचे वडील माजी खासदार, माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, मुलगा आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे अशा तीन पिढय़ा राजकारणात सक्रिय आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांची जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. काश्मीर मुद्दय़ावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करीत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून ते अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. निकालानंतर त्यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला. तेव्हा त्यांनी शिवसेनेत यावे यासाठी संपर्क साधला होता; पण त्यांनी नकार देत भाजपचीच साथ कायम ठेवली होती. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले असताना त्यांनी भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सूचक म्हणून भरला. विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांना उमेदवार संपर्क साधत होते; तथापि आपण भाजपवासी झालो आहे, असेच आवाडे सांगत राहिले. त्यांचा भाजपप्रवेश ही केवळ औपचारिकता उरली असून ती कधी पूर्ण होणार आणि भाजपमध्ये त्यांना नेमके काय स्थान मिळणार याची चर्चा होत आहे. तर आता राज्यात भाजप-एकनाथ शिंदे गटाची सत्ता आकाराला येत असल्याने आमदार आवाडे यांना मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याची नामी संधीही मिळताना दिसत आहे.

जवळीक अशी..

गेल्या काही दिवसांतील कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी वारंवार ‘भाजप, भाजप आणि भाजप’ असा उच्चार करण्यास सुरुवात केली आहे. यापुढील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये केलेल्या कामाने प्रभावित होऊन भाजपवासी झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार आवाडे आणि आवाडे कुटुंबीय भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि महाडिक परिवार, आमदार विनय कोरे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर तसेच आवाडे परिवार एकत्रित राहिल्याने जिल्ह्यात पिछाडीवर राहिलेल्या भाजपला नवी ऊर्जा मिळू शकते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp strong in kolhapur hands mla prakash awade election ysh
First published on: 01-07-2022 at 00:02 IST