रोहित वेमुला असो, की कन्हैय्या कुमार, शिक्षण; देशभरातील एकजात सर्व संस्थांवर भाजपला आपली  हुकमत चालवायची आहे. समाजात जातीधर्माच्या नावाखाली विषमता पसरवतानाच भारताला िहदुराष्ट्र करण्याचा त्यांचा डाव असला तरी पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांचे पुरोगामी विचार हा डाव मोडून काढतील, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी येथे जाहीर सभेत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ पुरोगामी नेते गोिवद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिजागर निमित्त दसरा चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. सभेला डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती लावली होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. पानसरे, दाभोलकर व कलबुर्गी यांची विचारधारा समाजात समता निर्माण करणारी आहे, पण या विचारांची सत्ताधाऱ्यांना भीती आहे, असा उल्लेख करून येचुरी यांनी भाजपाचा चेहरा उघड करताना सांगितले की, एकीकडे देशात मुस्लीम द्वेष पसरवायचा आणि दुसरीकडे पाकिस्तानच्या अध्यक्षांशी सलगी साधायची, हे राजकारण समजून घेतले पाहीजे. भाजपचा चेहरा हा सांप्रदायिक विषाने भरलेला आहे, ज्याच्यापासून देशाच्या अखंडतेलाच धोका आहे.भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून  शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या भाजप सरकारच्या विखारी चेहऱ्यापासून सावध झाले पाहीजे. भाजपच्या विरोधात तोंड उघडणाऱ्याला देशद्रोही ठरविले जात असल्याने सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल.

आपल्या विचारास विरोध करणाऱ्याची हीन पातळीवर जाऊन चारित्र्यहनन करण्याच्या संघवादी प्रवृत्तीविरूद्ध आपला लढा अटळ आहे, असे स्पष्ट करून भाकप नेत्या अमरजित कौर यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा पाढा वाचला. त्या म्हणाल्या, लोकशाही विचारप्रणाली मोडून काढून हुकूमशाही पध्दत देशात आणण्याचा त्यांचा कावा आहे.  समाजात भीती पसरवायची, जो की त्याचा खून करायलाच लोक तयार होतील, अशी या विचारसरणीची कार्यपद्धती आहे. प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, की भेकड राज्यकर्त्यांच्या पाठबळामुळे प्रतिगामी शक्ती बेभान होऊन उन्माद माजवू लागल्या आहेत. लोकांना उल्लू बनविणारा ‘मेक इन इंडिया’ हा कार्यक्रम खरेतर ‘सेल इन इंडिया’ असून त्यापासून देशाचे कसलेच भले होणार नाही.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wants to establish hindu rashtra said by sitaram yechury
First published on: 23-02-2016 at 06:05 IST