कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या दोन्ही परीक्षांमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थिनींनी अव्वल येण्याची कामगिरी केली आहे. पूर्व उच्च माध्यमिक परीक्षेत ईश्वरी दिग्विजय कोटकर तर पूर्व माध्यमिक परीक्षेत नुपूर युवराज पोवार या दोघी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
ईश्वरी ही भुदरगड तालुक्यातील सोनाली गावातील सोनाली प्राथमिक विद्या मंदिरात शिकत आहे. तिने ३०० पैकी २९४ गुण प्राप्त केले आहेत. तर नुपूर पोवार ही राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावातील नामदेवराव भोईटे विद्या मंदिरात शिकत असून, तिने २८८ गुणांची कमाई केली आहे.
कोल्हापूर महापालिकेचे यश
महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर मधील स्वरा अरुण पाटील व अद्वैत दिलीप पोवार या विद्यार्थिनींनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये संयुक्त पाचवा क्रमांक मिळवला आहे.
कोल्हापूर फॉर्मुल्याचे गमक
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिष्यवृत्ती सराव चाचण्या, जादा तास, शाळा स्तरावर शिष्यवृत्तीच्या धर्तीवर मॉडेल पेपर, शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सराव होण्यासाठी शिष्यवृत्ती पॅटर्न पुस्तिकेचा वापर केला जातो. शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे विद्यार्थी ही कामगिरी करीत असतात.