दयानंद लिपारे

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षाने प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात करण्याचे ठरवले आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन २४ मार्च रोजी युतीची पहिली महासभा होणार आहे. याच वेळी युतीतील उभय नेत्यांसमोर मात्र पक्षांतर्गत गुंतागुंतीचा पेच आहे. नाराजी, गटबाजी, साटेलोटय़ाचे राजकारण, विधानसभा निवडणुकीच्या समीकरणातून होणाऱ्या हालचाली, धनुष्यबाणाचा प्रचार करण्यातील जनसुराज्य पक्षासारख्या मित्रपक्षाची कोंडी अशा अडचणींच्या मुद्दय़ांच्या गाठी आणि निरगाठी सोडवण्याचे आव्हानही आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी शिवसेनेची असली तरी त्याला भाजपची साथ मोलाची तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. हे ओळखून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा वाहून घ्यायला सुरुवात केली आहे.  पण याच वेळी सेनेच्या उमेदवाराने उपस्थित केलेल्या प्रश्नावरून युतीतील ऐक्यावर प्रश्नचिन्ह लागले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

महाडिक दाम्पत्यांकडे लक्ष

मंडलिक यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांना प्रचारात आणले पाहिजे अशी जाहीरपणे अपेक्षा व्यक्त केल्यावर मंत्री पाटील यांनी भाजपाची बैठक घेऊन महाडिक दाम्पत्यांना प्रचारात सक्रिय होण्यास सांगितले. या वेळी माध्यमांनी आमदार महाडिक यांना विचारणा केली असता प्रचारात सहभागी होण्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याने सेनेत नाराजी आहे. आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना यावर मार्ग काढावा लागेल.

शिवसेनेतील गटबाजी

लोकसभा निवडणुकीत दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असताना सेनेतील गटबाजी ऐन प्रचारकाळात उधळली. आमदार चंद्रदीप नरके आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष, जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याच्या वादातून ठिणगी

उडाली. आमदार राजेश क्षीरसागर यांचे महाडिक गटाशी सलोख्याचे संबंध असल्याने विधानसभा निवडणुकीशी सांगड घालून निष्ठेविषयी शंका उपस्थित केली. आमदार डॉ. सुजित  मिणचेकर यांच्या विरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देण्यात आल्या. अशा मतभेदांवर सेना पक्षप्रमुखांना मार्ग काढावा लागेल.

मित्रपक्षांची कोंडी

जनसुराज्यशक्ती पक्षाने भाजपला पाठबळ देऊन सहयोगी पक्ष होण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे हे पेचात सापडले आहेत.

लोकसभेला सेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार करायचा तर सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत याच चिन्हाच्या विरोधात प्रचार कसा करायचा याचा गुंता निर्माण झाला आहे.