कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील २० पूरग्रस्त गावांमध्ये तात्पुरती घरे बांधून दिली जातील. तसेच सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातील या वर्षांत होणारम्य़ा पूरग्रस्त गावातील मुलींच्या विवाहाचा खर्च आपण वैयक्तिक उचलणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन व चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून पूर बाधितांसाठी निवारा शेड बांधण्यात आलेल्या श्री सिद्धगिरी नगरचा लोकार्पण सोहळा पाटील यांच्या हस्ते झाला, या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाधितांना तात्पुरत्या घरांचे वाटप करण्यात आले. कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्व्र महाराज, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार निवेदिता माने, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, विजय भोजे, डॉ. नीता माने, भवानसिंह घोडपडे, सरपंच संजय पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले,की घरे पूर्ण पडलेल्या ग्रामीण भागासाठी अडीच लाख व शहरी भागासाठी साडेतीन लाख रुपये मदत देण्यात येत आहे. घरे बांधून होईपर्यंत राहण्याची सोय तात्पुरती निवारा शेडमध्ये करण्यात येत आहे. त्यांना घर भाडे म्हणून २४ हजारांची मदतही दिली जाणार आहे. तात्पुरती घरे तालुक्यातील २० गावांमध्ये उभी केली जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन द्यावी. नुकसान झालेल्या मंदिरांचे बांधकाम पश्चिम देवस्थान समितीच्या माध्यमातून, तर तालमींची दुरुस्ती आमदार महेश लांडगे यांच्याकडून आणि पडझड झालेल्या शाळांची दुरुस्ती आपदा खात्यातून केली जाणार आहे.

दादांचा धाकटय़ा दादांना सल्ला

शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील हे रांगडय़ा वागणुकीसाठी प्रसिद्ध आहेत. हे रांगडेपण अधिक गहिरे होत असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंत पोचली होती. हा संदर्भ घेऊ न आमदारांना उल्लेखून ‘दादा वागण्यात सरळपणा आणा’ असा चिमटा काढणारा सल्ला दिल्यावर हंशा पिकला.