चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत महालक्ष्मीच्या पुजाऱ्यास मारहाण

महालक्ष्मी मंदिरातील पुजाऱ्यांच्या नेमणुकीवरून गेले काही दिवस कोल्हापुरात नवा वाद सुरू झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बठकीवेळी श्रीपूजक अजित ठाणेकर यांना करण्यात आलेली मारहाण. 

येथील महालक्ष्मी मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन आता मुद्दय़ावरून गुद्यावर आल्याचे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बठकीवेळी दिसून आले. या प्रश्नावर महसूल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना भाजप नगरसेवक आणि श्रीपूजक अजित ठाणेकर यांना पुजारी विरोधक गटाच्या लोकांनी मारहाण केली.

महालक्ष्मी मंदिरातील पुजाऱ्यांच्या नेमणुकीवरून गेले काही दिवस कोल्हापुरात नवा वाद सुरू झाला आहे. या बाबत गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची बठक आयोजित केली होती. या बैठकीस पुजारी हटाव संघर्ष समिती, सर्वपक्षीय नेते, प्रमुख सामाजिक कार्यकत्रे तसेच मंदिरातील श्रीपूजक उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मंत्री पाटील यांनी श्री महालक्ष्मीला घागरा-चोळी नेसवल्याबद्दल श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी दोन दिवस आत्मक्लेश करावा असा आदेश दिला. मंत्री पाटील हा निर्णय देत असताना ठाणेकर यांच्या दिशेने काहींनी चप्पलफेक केली. तर लगोलग काहींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. महसूलमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत ठाणेकर यांना मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पाटील यांनीच मध्यस्थी करत ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात त्यांच्या घरी पाठवले.

दरम्यान, करवीर निवासिनी महालक्ष्मी श्रीपूजकांच्या प्रश्नी महसूलमंत्री पाटील यांनी १२ जणांची समिती स्थापन केली असून, या समितीने सर्व बाजूंचा विचार करून ३ महिन्यांत निर्णय द्यावा, असा निर्णय या वेळी घेण्यात आला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil kolhapur mahalakshmi temple marathi articles

ताज्या बातम्या