कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर मध्ये सुरू होण्याबाबत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कोल्हापूर भूषण पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर , सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या ६ जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होण्यासाठी गेली चार दशके लढा सुरू होता. या मागणीला यश आले असून, रविवारी (१७ ऑगस्ट) सर्किट बेंचच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मेरी वेदर मैदानावर शुभारंभ सोहळा होणार आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी बार असोसिएशन व सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी शुभारंभ तयारीची माहिती दिली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने, माजी महापौर आर. के. पोवार, अशोक भंडारे, दिलीप पवार, सुभाष जाधव, बाबुराव कदम, महेश जाधव, रवीकिरण इंगवले, अनिल घाटगे, सुनील मोदी, वसंतराव मुळीक आदींनी भूमिका मांडली.
यावेळी शिवाजी राणे, अजित मोहिते, श्रीकांत जाधव, उपाध्यक्ष टी. एस. पाडेकर आदींसह वकील, कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
कोल्हापुरात आनंदोत्सव – प्रकाश आबिटकर
येत्या १८ ऑगस्टला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचच्या कामकाजास प्रारंभ होत असताना कोल्हापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील प्रस्तावित सर्किट बेंचच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी मंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शाखा अभियंता रोहण येडगे, कंत्राटदार अनिकेत जाधव, उदय घोरपडे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. इंद्रजित चव्हाण, टी. एस. पाडेकर, व्ही. आर. पाटील, के. व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील यांच्या समवेत केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्था या सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू होत आहे. कोल्हापूरच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यवस्था लोकांना स्थानिक पातळीवर देण्यात आल्या होत्या, असा उल्लेख आबिटकर यांनी केला.