कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिन निमित्त राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा सत्कार करण्यात आला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, ब्रँड अँबेसिडर शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी उपस्थित होते. 

त्या विभागास दंड

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा. न केल्यास त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निक्षून सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या  आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाइन दिलेल्या आहेत. अजून ३०० सेवा या ऑनलाइन  आणायच्या आहेत तर  १२५ सेवा ऑनलाइन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत आणि म्हणून शासनाच्या सर्व विभागांना १५ ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.जो शासनाचा विभाग १५ ऑगस्ट पर्यंत झाली नाही त्या विभागातील प्रत्येक सेवेकरिता दर दिवशी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत अधिकार आपल्या संविधानात समाविष्ट केले  हे मूलभूत अधिकार अधिकार सर्वांना मिळाले पाहिजेत.गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञानाच्या गतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे आणि म्हणून या सेवा अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.मंत्रालयात चेहरा पडताळणी ॲपमुळे देखील निम्मी गर्दी कमी झाली आहे. जीवनामध्ये इज ऑफ लिविंग आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.शासनाची सर्व सेवा व्हॉटसॲप वर तसेच सर्व माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध झाल्यास अनेक तक्रारी कमी होवून लोकांचे जीवनमान सुसह्य होईल असेही ते म्हणाले.