पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यांची धूळदाण उडाल्याने संतप्त नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या सभेत गोंधळ घालीत प्रशासनावर टीकेचा वर्षांव केला. अधिकारी, प्रकल्प सल्लागार व ठेकेदार यांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे रस्त्यांची वाट लागल्याचा आरोप सदस्यांनी केले. ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी रस्ते बांधणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडण्याचे मान्य करताना पुढील पावसाळ्यात खराब रस्ते दिसणार नाहीत, या शब्दात आश्वस्त केले.
दोन टप्प्यात सुमारे चार तास चाललेली सभा रस्ते कामाच्या खराब दर्जावरून चांगलीच गाजली. सत्यजित कदम यांनी निकषाप्रमाणे कामे होत नसल्याने रस्ते कामाची गुणवत्ता रसातळाला गेल्याचे सांगितले. पसे घेऊन निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंबई पालिकेप्रमाणे बेडय़ा घालण्याची मागणी केली. भूपाल शेटे यांनी शहरातील १५० रस्ते खराब झाल्याचे नमूद करून गतवर्षी ठरलेले नियम प्रशासन पायदळी कसे तुडवत आहे, याची माहिती देऊन अधिकारी, प्रकल्प सल्लागार व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सूरमंजिरी लाटकर यांनी शहरात २० कोटींचे रस्ते केल्याचे फलक उभारणाऱ्यांनी ते एकाच पावसात का खराब झाले याचा खुलासा कारण्याची मागणी करत आमदार अमल महाडिक यांच्यावर निशाणा साधला.
जयंत पाटील यांनी रस्ते काम करण्याच्या प्रक्रियेत नगरसेवकांचा सहभाग नसताना खापर मात्र त्यांच्यावर फोडले जात असल्याकडे लक्ष वेधले. अधिकारी व ठेकेदारांत छुपी भागीदारी असल्याचा आरोप करत ती मोडून काढण्याचे आव्हान आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले. महापालिकेचे वाभाडे निघत असताना जनसंपर्क विभाग करतो काय, अशी विचारणा करत विभागाच्या निष्क्रियतेवर पाटील यांनी कोरडे ओढले. सदस्यांनी टीका केल्याने प्रशासन चांगलेच वरमले होते. खुलासा करताना टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेले नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत बिथरलेले दिसले. त्यांनी खराब रस्त्याची जबाबदारी आपलीच असल्याची सुरुवात करत ठेकेदारांना केवळ नोटीस न देता रस्ते दुरुस्त करण्यात येतील. पुढील पावसाळ्यात असे चित्र दिसणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी मान्य केले.