कोल्हापूर : विमानात असते त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स (इवेंट डेटा ररकॉडगर), जीपीएस, रेडियो फ़्रीक्वेंसी आइडेंटिफिकेशन मेकॅनिकल कपलिंग, इलेक्ट्रिकल कनेक्टरसह अनेक जाचक यंत्रणा मालवाहू ट्रॅक्टर ट्रॉलीला लागू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. याचा वापर करणाऱ्या शेतकरी, वाहन चालक यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे याच्या विरोधात हरकती घेण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका नवीन मसुदा अधिसूचनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणारी ही अधिसूचना आहे. हा नियम म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेला अनावश्यक तंत्रज्ञानाचा मोठा आर्थिक भुर्दंड असल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे.
ट्रॅक्टरचा वापर सामान्यतः शेतकरी वर्गाकडून केला जातो. वाहतुकीचे काम अल्पशिक्षित वर्गाकडून होत असते. परंतु कोणाला सुबुद्धी सुचली कळत नाही. परंतु विमानाला असते त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स, वाहनाचा प्रवास सांगणारी जीपीएस यंत्रणा यासारख्या जाचक यंत्रणा आता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये वापर करणे केंद्र सरकारकडून बंधनकारक होत आहे.
दिल्लीतील वातानुकीत कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाही, अशी टीका करून आमदार पाटील यांनी मालवाहू ट्रॅक्टर या शब्दाची व्याख्या स्पष्ट करावी. त्यातून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ट्रॅक्टरना वगळावे किंवा ही संपूर्ण अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीसाठी नवीन आणि महागडे मेकॅनिकल कपलिंग आणि इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जुन्या, वापरात असलेल्या ट्रॉली बदलाव्या लागतील किंवा त्यावर मोठा खर्च करावा लागेल.
सरकारने १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी, ट्रॅक्टर मालक व शेतकरी संघटनांना या जाचक नियमांविरोधात खालील ईमेलवर लेखी हरकती पाठवण्याचे आवाहन केले आहे. यावेळी आनंदराव पाटील -बडबडे, बाळासाहेब आळवेकर, पांडुरंग बिरंजे, विद्यानंद जामदार, विठ्ठल माळी, श्रीकांत उलपे, भगवान चौगले, सुरेश पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, राजू चव्हाण, धनाजी गोडसे, मोहन सालपे, अजित पोवार , उमाजी उलपे ,हिंदूराव ठोंबरे , महादेव लांडगे, तानाजी बिरंजे , रमेश रणदिवे यांच्यासह संचालक, शेतकरी उपस्थित होते