कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग २४ तास पावसाची संततधार सुरू राहिली. मे अखेर होण्यापूर्वी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या, तर शेतीची मशागतीची कामे खोळंबली. दमदार पाऊस नसला तरी संततधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा काही प्रमाणात वाढत आहे.
काल सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी पडत आहेत. ढगाळ हवामान असल्याने पावसाळय़ाचा भास होत होता. पश्चिम भागात जोरदार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी शाळा, क्लासेसला जाणारे विद्यार्थी, नोकरदार मंडळींना छत्र्या, रेनकोटचा आधार घ्यावा लागला. पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. चंदगड, आजरा, राधानगरी शाहूवाडी,पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या तालुक्यात मोठय़ा पावसाची शक्यता आहे.
धुळवाफ पेरा खोळंबला
काल गुरुवारी सायंकाळी पावसाने संतधार सुरू केली ती आजही कायम राहिली. संथ स्वरूपात सलग सुरू असणाऱ्या पावसामुळे वाफे पाण्याने तुंबले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा धुळवाफ पेरा खोळंबला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात पिकाची धुळवाफ पेरणी करण्यासाठी जमिनीची मशागत केली होती. परंतु पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा जमिनीची मशागत करावी लागणार आहे. आज दिवसभर हवेत गारवा आणि धुके होते. त्यातच शेतीकामे खोळंबल्याने बाजारपेठांमध्ये छत्र्या, रेनकोट, प्लाष्टीक कागद स्टॉलवर खरेदीची गर्दी दिसून येत होती.