कोल्हापूर : ठेकेदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ कोल्हापुरात शासकीय ठेकेदारांनी गुरुवारी आंदोलन केले. हर्षल पाटील याला न्याय द्यावा, ते मक्तेदार नसल्याची दिशाभूल शासन -प्रशासनाने थांबवावी, जलजीवन मिशनची प्रलंबित देयके तातडीने देण्यात यावीत, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर मक्तेदारांनी गुरुवारी मूक निदर्शने केली.
जलजीवन योजनेचे काम करणाऱ्या हर्षल पाटील या सांगलीतील मक्तेदाराने आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकारावरून या योजनेची कामे करणाऱ्या मक्तेदारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यातील मक्तेदार जिल्हा परिषदेच्या दारात जमले. काळ्या फिती बांधलेल्या मक्तेदारांच्या हातात हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहणारा फलक होता. तुझा मृत्यू व्यर्थ जाणार नाही. शासन – प्रशासनाला जाग येणार की नाही? असा मजकूर त्यावर लिहिलेला होता.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषद मक्तेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश नलवडे म्हणाले, अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊन हर्षल पाटील हे राज्याचा विकास घडवण्याच्या हेतूने प्रयत्नशील होते. त्यांनी शासन, जिल्हा परिषदेची अनेक कामे केली असून, त्याची यादीच शासनाकडे पाठवली आहे. शासनाने त्यावरून दिशाभूल थांबवावी. राज्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १२ हजार कोटींची देयके थकीत असून, त्यात कोल्हापूर जिल्ह्यात २५० कोटी रुपये थकीत आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या होताना ऐकले होते. आता विकास घडवणाऱ्या विकसकांवर अशी दुर्दैवी वेळ आली आहे. एक हर्षल झाला पुन्हा दुसरा होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी. थकीत देयके त्वरित द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.