वेगानं वाढत असलेली रुग्णसंख्या… आरोग्य सुविधांवर पडत असलेला अतिरिक्त ताण आणि बेड, ऑक्सिजन, औषधींचा तुटवडा यामुळे राज्यात आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाउन निर्णय घेतले जात आहे. सातारा जिल्ह्यात आणि बारामतीमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर आज सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रसार नियंत्रित व्हावा, यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम विषाणू प्रसाराला आळा घालण्यावर होत नसल्याचं चित्र आहे. राज्यातील रुग्णावाढीचा आलेख कायम असून, ५० ते ६० हजारांच्या दरम्यान राज्यात रुग्णवाढ होत आहे. यात काही जिल्ह्यांतील परिस्थिती अजून चिंताजनक आहे. जिल्ह्यात वाढती करोना रूग्णसंख्या पाहता बुधवारपासून (५ मे) पुढील १० दिवस कडकडीत टाळेबंदी पाळण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्ह्यात वाढणारी करोना रूग्णसंख्या आणि त्याप्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे सहभागी झाले होते. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये रूग्णसंख्या वाढत राहिली, तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. विषाणूची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून जिल्ह्यात कडकडीत टाळेबंदी लागू केली जात आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

लसीकरणासाठी सवलत

मुश्रीफ म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयानेही टाळेबंदीचा पर्याय सूचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी त्याचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी.’ यड्रावकर यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना टाळेबंदीत सवलत दिली जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी सकारत्मक दर कमी नाही. जिल्ह्यातील २४०० रूग्ण प्राणवायूवर आहेत. कोल्हापूरला सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातीतून प्राणवायू पुरवला जात आहे.’

गोकुळ आणि लॉकडाउन

कोल्हापूर जिल्ह्यात करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशाही स्थितीत न्यायालयाच्या आदेशाने गोकुळ दुध संघाची निवडणूक घेतल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. आज निकाल लागला आणि कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतल्याने त्यावरून टीकात्मक चर्चा होत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona cases and lockdown updates strict lockdown in kolhapur satej patil bmh
First published on: 04-05-2021 at 14:44 IST