कोल्हापूर : मी भ्रष्टाचार केला असेल तर केवळ इशारे देणाऱ्यांना मुहूर्त कशाला लागतो. माझा भ्रष्टाचार जरूर बाहेर काढावा, असे आव्हान ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी समरजितसिंह घाटगे यांना दिले. श्री शाहू कारखान्याचे अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर वाढदिवसासंबंधी खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. यावरून त्यांनी कागल पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली आहे. यावरून दोघात वाद रंगला आहे.
याबाबत पत्रकारांनी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, की मी गेल्या ५० वर्षांपासून रामनवमीला वाढदिवस साजरा करीत आहे. कारण माझा जन्म रामनवमी दिवशी झाला हे सत्य आहे. माझ्याकडून आता हा विषय संपला आहे. अडीच वर्षे गायब असणाऱ्यांना अचानक आता झटका आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी समरजित घाटगे यांच्या आईंना धमकीचा फोन आल्याची जोरदार चर्चा घडवण्यात आली. याबाबत काहीही सुगावा नाही. अशा बतावणी करणाऱ्यांना जनता ओळखून आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.