कोल्हापूर : कणेरी मठावरील विषबाधा झालेल्या गाईंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सलाईन उपचार थांबवण्यात आले असून शनिवारी गाईंनी आहार सुरू केला आहे. गाई मृत्युसंख्येत वाढ झालेली नाही.

कणेरी येथील सिद्धगिरी मठामध्ये विषबाधा झाल्याने भारतीय देशी गाई दगावल्या होत्या. शिळे अन्न खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.

याची दखल घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने अस्वस्थ गाईंवर उपचार सुरू ठेवले आहेत. त्यांची दोन पथके तेथे तैनात केली आहेत. आता गाईंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

 याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण शनिवार म्हणाले, चार गाईंना सलाईन द्वारा उपचार केले जात होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. त्यांनी चारा, पशुखाद्य असा आहार सुरू ठेवला आहे. गाई दगावण्याच्या संख्येमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. गायींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गाईंच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा होईल.

 दरम्यान, मोठय़ा प्रमाणात गाई मृत्युमुखी पडल्याने शासकीय पातळीवरही त्याची गंभीर दखल घेतली आहे. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिनचंद्र प्रतापसिंह, प्रादेशिक आयुक्त डॉ. संतोष पाचपोर, सहआयुक्त रोग अन्वेषण विभाग डॉ. घुलपुरे तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. राहुल रेखावर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कणेरी मठातील गो शाळेला भेट दिली. त्यांनी जखमी गाई व इतर गाईंची पाहणी केली.