जनतेने हद्दपार केलेले लोक आम्हाला आता जाब विचारत आहेत. कोल्हापूर टोलमध्ये मलिदा खाणारेच टोल कधी बंद करणार असे विचारत आहेत, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर केली.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, की काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत एवढे वाईट काम केले की लोकांनी त्यांना घरी बसवले. यातील काँग्रेसने तर या देशालाच गेली ६० वर्षे लुटले. आता हेच पक्ष आम्हाला एक वर्षांच्या आत विकासकामांचा जाब विचारत आहेत. गेल्या ६० वर्षांत यांना एकही शहर आदर्श करता आले नाही आणि आता हीच मंडळी आम्ही आणलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेवर टीका करत आहेत. कोल्हापूरसाठी आजवर काहीही न करणाऱ्या या मंडळींना या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे का? कोल्हापूर शहराच्या विकासासाठी या शहराचा समावेश नव्या ‘अमृत योजने’त करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
कोल्हापूर टोलमुक्तीबाबतही विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, की या टोल प्रकरणात मलिदा खाण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीने केले. त्या वेळी टोलमुक्तीची आंदोलने होत असताना ही मंडळी गप्प होती. ही टोलमुक्ती आम्ही करून दाखवली.
प्रचाराचा आढावा
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी करवीरनगरीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी निवडणूक प्रचाराचा आढावा स्थानिक नेत्यांकडून घेतला. प्रचार यंत्रणा सुरळीत सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी महापालिकेत भाजपच्या ताराराणी आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. तर रात्री झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेचेही वाभाडे काढले. मुख्यमंत्र्यांची सभा भाजपच्या प्रचारात जान ओतणारी ठरली.
कोल्हापूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. स्थानिक पातळीवर ताकद असलेल्या ताराराणी आघाडीला सोबत घेऊन सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू ठेवल्या आहेत. मतदारांपर्यंत भाजपची भूमिका पोहोचवण्यासाठी स्टार प्रचारकांच्या सभांचाही फड रंगत ठेवला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार कळसाध्याय ठरला.
सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम आवरून फडणवीस सायंकाळी येथील हॉटेल पंचशीलमध्ये दाखल झाले. त्यांचे पक्षकार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहर भाजप अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक यांच्याशी प्रचार यंत्रणेबाबत चर्चा केली. पाटील यांनी कोल्हापूरचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विमानतळ, पंचगंगा नदी प्रदूषण, महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा यासाठी निधी उपलब्ध होण्याची गरज व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीपासून आमदार महादेवराव महाडिक यांना मानणारा वर्ग भाजपशी जोडला गेला आहे. त्यामुळे ताराराणी आघाडीशी युती करून निवडणूक लढवली जात आहे. विरोधकांकडून गुन्हेगारीच्या मुद्यांचे स्तोम माजवले जात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास या वेळी आणून देण्यात आली. या सर्व परिस्थितीचा कानोसा घेतल्यानंतर आणि उमेदवार, पक्ष, कार्यकत्रे यांच्याकडून प्रचार सुरळीत असल्याची खात्री झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सभास्थळी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticises ncp and congress
First published on: 28-10-2015 at 04:00 IST