कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील जवळपास दिडशे वर्ष जुन्या शिवाजी पुलास समांतर असणाऱ्या पुलाचे थांबलेले बांधकाम सुरू करण्यासाठी केंद्र शासन येत्या २ दिवसात अधिसूचना काढणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी बुधवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी पूल प्रश्नासंदर्भात बठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.  शिवाजी  वाहतुकीसाठी योग्य नसल्याने त्याच्या शेजारीच समांतर पूल बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतले आहे. मात्र, या भागात प्राचीन अवशेष असल्याचे सांगून काही सामाजिक संस्थांनी पुरातत्त्व विभागाकडे बांधकाम थांबविण्याची मागणी केली . त्यामुळे पुरातत्त्व विभागाने या बांधकामावर बंदी आणली होती. आजच्या बठकीत महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुलाच्या भागातील प्रत्यक्ष चित्र मांडणारे सादरीकरण करून या जागेत कोणतेही प्राचीन अवशेष नसल्याचे सांगण्यात आले. तसेच, हा पूल जुना झाला असून वाहतूक सुरूच राहिल्यास वाहनधारकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. तसेच, चार जिल्हय़ांना जोडणारा शिवाजी पूल या भागातील महत्त्वाचे संपर्क साधन असल्याची बाब मांडण्यात आली.  या सर्व बाबींचा विचार करून येत्या दोन दिवसात शिवाजी पुलाला समांतर पुलासंदर्भात अधिसूचना जारी करणार असल्याचे शर्मा यांनी या बठकीत सांगितले. तसेच, सात दिवसात कॅबिनेटपुढे विषय मांडून बंद पडलेल्या पुलाचे काम सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येईल, असे आश्वासन,  शर्मा यांनी दिले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mahesh sharma comment on shivaji bridge
First published on: 08-09-2016 at 00:13 IST