करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरातील गजबज वाढली असताना दुपारी ‘मंदिर परिसरात घातपात होण्याची शक्यता आहे’ असा निनावी फोन पोलिसांना आला. त्यावर सर्व यंत्रणांची एकच तारांबळ मिळाली. पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर बंद केले. दर्शन रांग थांबवण्यात आली. मंदिर परिसरात कसून शोध घेण्यात आला. तेथे काही संशयास्पद आले नाही. त्यानंतर दोन तासानंतर पुन्हा मंदिरातील विधी आणि दर्शन रांग सुरू झाली. मात्र या प्रकारामुळे नाहक गोंधळ निर्माण झाला होता.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर भाविकांना खुले झाले. करोना नियमाचे पालन करीत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विजयादशमी पर्यंत ही गर्दी अशीच राहण्याची चिन्हे आहेत. घटस्थापनेपासून मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महालक्ष्मी व दखनचा राजा जोतिबा यासह तीन हजाराहून अधिक मंदिरे उघडण्याच्या निर्णय घेतला होता.
आज पहाटे पाच वाजता महालक्ष्मीचे मंदिर उघडण्यात आले. ‘अंबा माता की जय’ असा गजर करीत भाविकांनी मंदिरात प्रवेश केला. प्रथम काकड आरती झाली.नंतर अभिषेक करण्यात आला. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ई -पास असलेल्या भाविकांना दर्शनासाठी मुभा होती. भाविकांनी ऑनलाईन नोंदणी मोठ्या प्रमाणात केली आहे. पुढील तीन दिवसाचे नोंदणी आत्ताच पूर्ण झाली आहे. मंदिराच्या पूर्व बाजूकडून भाविकांना प्रवेश दिला जात आहे.