वायदे बाजारातून शेतीमालाचे दर पाडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. वायदे बाजारातील गैरव्यवहाराची चौकशी करून त्यावर कडक कारवाई करा, अशी सेबीकडे मी मागणी केली असून, वायदे बाजाराचा उपयोग भविष्यातील दरांचा कल समजण्यासाठी व्हावा, निव्वळ सट्टेबाजी व गैरव्यवहारासाठी नको, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. वायदे बाजाराच्या चौकशीच्या मी केलेल्या मागणीचा वर्मी घाव आमदार हसन मुश्रीफ यांना बसलेला दिसत आहे, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी मुश्रीफ यांच्यावर शनिवारी पलटवार केला आहे.
वायदे बाजाराबाबत शेट्टी यांची भूमिका व्यापारीधार्जणिी असल्याची टीका कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. शेट्टी म्हणाले, साखरेचे दर पाडून आíथक अडचण असलेल्या व दुर्बल कारखान्यांना साखर विक्री करण्यास भाग पाडत मूठभर लोकांद्वारे साखर खरेदी करण्यात येत होती. या खरेदीदारांना मोठय़ा प्रमाणात अॅडव्हान्स आगाऊ रक्कम काळय़ा पशाच्या स्वरूपात पुरवठा करून कमी दरात भरमसाट साखर खरेदी करण्याचे षडयंत्र रचले जात होते.
साखरेचे दर नंतर वाढविणे व कमी दरात खरेदी केलेली साखर चढय़ा दरात विक्री करायचा, प्रचंड नफा कमविण्याचा हा मुश्रीफ यांच्या बोलवत्या धन्याचा डाव मी ओळखला होता, असे म्हणत शेट्टी यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, जादा साखर शिल्लक आहे, अशी ओरड होत असताना साखर कारखान्यांमधील साखर संपली. वायदे बाजाराचा वापर करीत पद्धतशीरपणे भाव वाढायला लागले व वायदे बाजारात साखरेचे दर थेट ३२९० रु प्रतििक्वटलपर्यंत वाढले मात्र वाढलेल्या दराचा फायदा मात्र साखर कारखान्यांना होत नसून त्यांची साखर चढय़ा दराने विक्री होत नाही, कारण दरवाढ त्यांच्यासाठी नसून साठेबाजांनी आधी खरेदी केलेली साखर नफा कमवत विक्री करण्यासाठी आहे. त्यांची साखर मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने कारखान्यांची साखर खपत नाही हे चित्र आहे
साखरेच्या वाढीव दराचा फायदा ना शेतकऱ्यांना होत आहे ना साखर कारखानदारांना, असे नमूद करून शेट्टी म्हणाले, ज्याच्या मनामध्ये पाप नाही त्याला चौकशीची भीती का वाटावी,
घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळल्या जातील मात्र तुमचा त्रागा का, राधाकृष्ण विखे पाटील व साखर संघ अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनीदेखील वायदे बाजारातील गरव्यवहारांची चौकशीची मागणी केली आहे, मग त्यांचे कोणत्या साखर व्यापाऱ्याशी संबंध आहेत हे तपासून मला सांगावे, असे आव्हान शेट्टी यांनी मुश्रीफ यांना दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2016 रोजी प्रकाशित
वायदे बाजारात दर पाडून शेतक-यांची लूट- राजू शेट्टी
वायदे बाजाराचा उपयोग निव्वळ सट्टेबाजी व गैरव्यवहारासाठी नको
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-01-2016 at 03:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers loot due to lower prices in commodity market raju shetty