रद्द नोटा देवघेवीवरून व्यवहार ठप्प

भारतीय चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय  मोदी सरकारने घेतल्याने त्याचा फटका येथील  व्यापार पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात बसला. निर्णयानंतरची पहिली, म्हणजे बुधवारची सकाळ कोल्हापुरातील मार्केट यार्ड मधील व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वादावादीने सुरू झाली. व्यापाऱ्यांनी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा शेतकऱ्यांना देऊ केल्या पण शेतकऱ्यांनी त्या नाकारल्या. त्यातून सुरू झालेला वाद बराच काळ सुरू राहिल्याने बाजार समितीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. बाजारपेठेत आज नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे मार्केट यार्डमध्ये म्हणावे तितक्या प्रमाणात मालाची उचल झालेली नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. भाज्यांचे दर वीस टक्के घसरल्याने शेतकऱ्यांना आíथक फटका बसला.

कोल्हापुरातील मार्केट यार्ड मधील व्यापारपेठ आज नेहमीप्रमाणे सकाळी ५ वाजता सुरू झाली. पण आजचे चित्र मात्र वेगळे होते.  दररोज गुण्यागोिवदाने व्यवहार करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू झाले. याला कारण ठरले ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा.

काल मध्यरात्रीपासून मोदी सरकारने भारतीय चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. आज सकाळी शेतकरी आपला माल घेऊन आडत्याकडे आला,

आडत्यानेही योग्य किंमत मोजत माल विकत घेतला. पण, या मालाचे  शेतकऱ्याला पसे देताना मात्र दोघांमध्ये वाद सुरू झाला. शेतकरी ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा स्वीकारायला तयार नाही, तर आडत्याकडे १०० रुपयांच्या नोटा शेतकऱ्याला द्यायला नव्हत्या. हे कमी की काय म्हणून समितीत माल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला गावाकडून लोकांचे निरोप देणारे फोन आले. त्यांनी ५०० किंवा १००० च्या नोटा स्वीकारू नका, असे निक्षून सांगितले, त्यामुळे आज मार्केट यार्ड मध्ये नोटांवरून व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चांगलीच जुंपली  होती.

आडते आणि शेतकरी आपल्याच मुद्दय़ांवर अडून राहिले. कोणीच माघार  घेण्याचे नाव घेईना. कोणी मध्यस्थी करू लागला तरी त्याचेही कोणी मनावर घेईना. हा बाका प्रसंग पाहता मार्ग निघणेही कठीण होऊन बसले. यातून बाजार समितीत तणाव निर्माण झाला. गोडीगुलाबीने व्यवहार करणारे आज मात्र एकमेकांच्या उरावर बसण्याची भाषा बोलू लागल्याने जाणतेही चिंतेत पडले होते. काही व्यापाऱ्यांनी नंतर शंभर रुपयांच्या नोटा देतो असे सांगून वाद शमवला .

याबाबत बाजार समितीचे संचालक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे लोकसत्ताशी बोलताना म्हणाले, आज समितीत आडते व शेतकऱ्यांमध्ये वाद झाले असले तरी त्याचा मोठा परिमाण त्यांच्या दीर्घकालीन व्यवहारावर होणार नाही. बदलामुळे काही परिमाण होतात, त्याचाच हा एक भाग आहे. दोघांचे संबंध, आíथक देवघेव पाहता आजचे पसे उद्या दिले जातील. भाज्यांचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना तोटा झाला.