पाटणनजीकच्या नवारस्ता येथील एसटी बस थांब्यासमोरील औषधालय, दोन कपडे धुलाईकेंद्र, केशकर्तनालय व किराणा दुकानाबरोबरच पाठीमागील घराला आज रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग विद्युत वाहिनीतील दोषामुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कराड-पाटण रस्त्यावर नवारस्ता चौकातील ओमसाई मेडिकलला आग लागली. आणि आग भडकतच गेल्याने लगतच्या निनाई किराणा, २ लाँड्री, सलून व दुकानापाठिमागील घरांना आगीने लक्ष्य केले. सोनल विलास माथणे (रा. नवा रस्ता, ता. पाटण) यांच्या औषध दुकानाचे १५ लाखांचे नुकसान झाले, तर हिराबाई दत्तात्रय पाटील (रा. नवा रस्ता) यांचे राहते घर व किराणामाल दुकानासह अन्य मिळकतीचे मिळून ६ लाख ७० हजारांचे नुकसान झाले. तसेच, राजाराम ठोंबरे (रा. नाडोली, ता. पाटण) यांचे सलून दुकान व प्रकाश पांडुरंग माने यांचे घरही यात जळून खाक झाले.
ओमसाई मेडिकल स्टोअर्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या घराच्या माडीवर झोपलेल्या अशोक दत्तात्रय पाटील यांना पहाटेच्या सुमारास झोपेतच गुदमरल्यासारखे वाटू लागल्याने ते झोपेतून उठून पाहता मेडीकल शॉपीला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विनाविलंब घरातील सर्वाना झोपेतून उठवून घराबाहेर काढले. आणि या सर्वानी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग अगदीच भडकली असल्याने तेथील सर्व मिळकती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. पाटण खरेदी विक्री संघाच्या पाणीबंबाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे आणखी अनर्थ टळला. घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिसात झाली असून, पाटणचे नायब तहसीलदार विजय माने, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to shop in karad
First published on: 25-01-2016 at 01:40 IST