कोल्हापूर: संयुक्त राष्ट्रसंघाने विकासाला शाश्वत करण्यासाठी १७ उद्दिष्ट सुचवली आहेत. ही उद्दिष्टे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यानंतरच विकासाला शाश्वततेचे रूप प्राप्त होईल व विकास हा सर्वांगीण व सर्वांना लाभदायी असा ठरू शकेल याच हेतूने राज्य शासनाने मित्रा संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला बळकटी मिळत आहे. राज्यातील उद्योजक, बिल्डर्स, बार असोसिएशन, डॉक्टरांच्या संघटना तसेच शिक्षक प्राध्यापक शास्त्रज्ञ शेतकरी व विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे तज्ञ व अभ्यासक या सर्वांसोबत शाश्वत विकासाबाबत विचार विमर्श होऊन विकासाला शाश्वत रूप देण्यासाठी राज्यातील पहिलीच शाश्वत विकास परिषद २५ जून रोजी कोल्हापुरात पार पडणार असल्याची माहिती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या परिषदेच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रमुख अधिकाऱ्यांची नियोजनात्मक बैठक पार पडली.

यावेळ क्षीरसागर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. या विकसित भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही केंद्र शासनासोबत गतीने कामकाज करण्यास सुरवात केली आहे. देशाचा व पर्यायाने राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना तो शाश्वत स्वरूपाचा असणे व विकासामध्ये प्रत्येक घटकाचे योगदान असते आवश्यक आहे. यातूनच शाश्वत विकास परिषद या संकल्पनेचा उगम झाला आहे. या परिषदेच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार या प्रमुख क्षेत्रांवर भर देवून राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

हेही वाचा – कोल्हापूर : डॉ. माणिकराव साळुंखे ,समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

ते म्हणाले, राज्याचा सर्वांगीण विकास जिल्ह्यांच्या आर्थिक उन्नतीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला विकासाचे उद्दिष्ट ठरवून देत राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फौंड्री व्यवसाय आहेत. यासह राज्यातील इतर मुख्य औद्योगिक क्षेत्रांसाठी सहाय्य करणारे उद्योगही आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढीसाठी या परिषदेचा फायदा होणार आहे. यासोबतच कृषी विषयक योजना राबवून जिल्ह्याच्या उत्पन्नस्रोतात भर टाकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

परिषदेचा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक वाढविता येते याची चाचपणी करणे गरजेचे आहे. यासह रोजगार विषयक कर्ज योजनांना गती देण्याची आवश्यकता आहे. या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राला वाव आहे. यासह धार्मिक स्थळे, नैसर्गिक पर्यटन स्थळे, पर्यटन केंद्रांच्या माध्यमावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने उद्धिष्ठपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे.

हेही वाचा – स्मार्ट प्रीपेड मीटर्स योजना रद्द केल्याची देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा करावी – प्रताप होगाडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूरच्या दृष्टीने मैलाचा दगड

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मित्रा संस्थेने राज्याच्या उत्पन्नवाढीस नवनवीन संकल्पनाद्वारे चालना देण्याचे काम सुरु केले आहे. यामध्ये उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. राज्याची ही पहिलीच परिषद आपल्या प्रयत्नातून कोल्हापुरात होते आहे. विकासाला चालना मिळावी यासाठी ही परिषद असून, कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणारी असणार आहे. त्यामुळे या संकल्पनेत जिल्ह्यातील सर्वच घटकांचे योगदान असावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले. या बैठकीस सह मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्रा संस्था अमन मित्तल, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन एम., आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका उपयुक्त राहुल रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यासह सर्व प्रमुख विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते