जयसिंगपूर येथे बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या ६ जणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी जेरबंद केले. दोनच दिवसांपूर्वी या टोळीने िपपळगाव (ता. भुदरगड) येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. यामध्ये एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. या टोळीकडून दोरी, कटावणी, लहान गॅस सिलिंडर, ऑक्सिजन गॅस सिलिंडर, गॅस कटर, मिरची पावडर, मोटार असा एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल पो्लसांनी जप्त केला.
विजय नामदेव पाटील (२६ सम्राट कॉलनी, कोल्हापूर), महादेव मारुती लोहार (वय १९ कडगाव, ता. गडिहग्लज), सुनील बाळासाहेब पाटील (वय १९, रा. अयोध्यानगर कडगाव, गडिहग्लज), बलराज रघुनाथ केसरकर (वय १८, रा. हासुर बुद्रुक, ता. कागल), सागर तानाजी कमलाकर (वय ३०, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांच नावे आहेत.
जयसिंगपूर ते शिराळे रोडवर असणाऱ्या २०व्या गल्लीमध्ये असणाऱ्या बँक ऑफ बडोदा या बँकेच्या एटीएम सेंटरवर काही तरुण दरोडा टाकणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे दिनकर मोहिते यांना मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एटीएम सेंटर बाहेर सापळा रचला. रात्री २ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या अल्टो गाडीमधून (एमएच ०९- एक्यू -५१२९) काही तरुण एटीएमजवळ आले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गाडीतील तरुणांची चौकशी केली असता त्या तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल तपास करत गाडीची कसून तपासणी केली असता गाडीच्या मागील बाजूस पोलिसांना ऑक्सिजन सिलिंडर व गॅस कटर आढळून आले. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता एटीएम फोडण्याच्या तयारीत असल्याची कबुली तरुणांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक
जयसिंगपूर बँक एटीएम
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-02-2016 at 03:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang arrested who comes for robbery