प्रशासनाची जय्यत तयारी

शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवार, १२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. सोहळा पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाल्या असून, घाटांची उभारणी, घाटावरील विद्युतीकरण, रस्ते, पार्किग आदी सर्व पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दर बारा वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळा येत्या १२ ऑगस्टपासून भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी यांनी या कामी सहकार्य केले आहे. सर्व विकासकामांचा सूक्ष्म आराखडा तयार करुन त्यानुसार सर्व यंत्रणांना सक्रिय केले आहे.

राज्य शासनाच्यावतीने कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी १२१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात कन्यागत सोहळ्यासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी ६५ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला असून तो येथील विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे.

कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यामध्ये भाविकांची गरसोय होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या आहेत.

उत्सव मूर्तीचे १२ ऑगस्ट रोजी सूर्योदयाला, शुक्लतीर्थ येथे स्नान झाल्यानंतर कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास प्रारंभ होतो. १०४ मीटरच्या शुक्लतीर्थ घाटाची आकर्षक बांधणी केली असून या ठिकाणी मोठा घाट तयार करण्यात आला आहे. १२ ऑगस्टपासून सप्टेंबर २०१७ या कालावधीत कन्यागत महापर्वकाळ सोहळा साजरा होत असून वर्षभर पर्वण्या सुरु राहणार असून भाविकांना या पर्वणीकालामध्ये पवित्र स्नानाचा आनंद घेता येईल.

सोहळ्याचे धार्मिक महत्त्व

कन्यागत महापर्वकाळ हा दर १२ वर्षांनी संपन्न होतो. कन्या राशीमध्ये गुरु ग्रहाचे वास्तव्य १३ महिने असते. या पु??ण्यपावन काळामध्ये गंगा नदी कृष्णा नदीच्या भेटीला येते व पर्वकाल संपन्न होईपर्यंत कृष्णा नदीच्या सहवासात वास्तव्य करते, अशी महती असल्याचे सांगून श्री क्षेत्र नृसिंहवाडी देवस्थान समितीचे सचिव संजय पुजारी म्हणाले, की कृष्णा आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमाकाठी वसलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा तीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशीतीर्थ, काम्यतीर्थ, सिध्दवरदतीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ, शक्तीतीर्थ व प्रयागतीर्थ अशी अष्टतीथ्रे आहेत. कन्यागत महापर्व काळात अष्टतीर्थ स्नानास अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. कन्यागत सोहळ्याचे मुख्यस्थान हे अष्टतीर्थापकी एक असे शुक्लतीर्थ आहे.