कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ‘गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः’ची अनुभूती घेत शाळा, मंदिरांत पाद्यपूजन, गुरुवंदनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
व्यास अर्थात गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सर्वत्र गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील अनेक मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भजन, कीर्तन आणि प्रवचनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सनातन प्रभात संस्थेच्या वतीने दोन ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नृसिंहवाडी भाविकांनी फुलली
श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. गुरुवार व गुरुपौर्णिमा असा दुग्ध शर्करा योग आल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक येथील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दत्त चरण कमलावर पुराचे पाणी असल्यामुळे मंदिरातील नित्य कार्यक्रम श्रींच्या उत्सव मूर्तीवर पार पडत आहेत.
नेटके नियोजन
पहाटे “दिगंबरा दिगंबरा” नाम जपाची नगर प्रदक्षिणा पार पडली. काकड आरती, अभिषेक, श्रींच्या उत्सव मूर्तीची महापूजा, पंचसूक्त पठण, धूप दीप आरती व इंदूकोटी असे कार्यक्रम दिवसभरात पार पडले. दत्त देव संस्थानमार्फत आयोजित महाप्रसादाचा दहा हजारांवर भाविकांनी लाभ घेतला. चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तसेच मंदिर मार्ग खुला ठेवल्यामुळे भाविकांना ये जा करणे सोयीचे झाले होते.
स्वामी भक्तांचे रक्तदान
इचलकरंजीत दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे महेश चव्हाण यांच्या हस्ते आरती, तर नैवेद्य आरती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आली. सामाजिक उपक्रम म्हणून १०८ हून अधिक सेवेकरी यांनी रक्तदान केले.