कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भेटलेल्या दोघा माणसांनी १६० जागा निवडून देण्याची खात्री केली होती. असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणत असतील तर त्यांनी त्या लोकांचे मोबाईल नंबर, पत्ता असा तपशील का ठेवला नाही. विधानसभा निवडणूक होऊन नऊ महिने झाल्यावर ते गुगली आता टाकत आहेत. त्याला संजय राऊत होकार देत आहेत. अशा कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजनच होईल, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या विधानाची खिल्ली उडवली.
सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, मतचोरी संदर्भात निवडणूक आयोगाने आधीच उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्यांचे खंडन केले आहे. निवडणुकांमध्ये कच्च्या मतदाराच्या लोकांसमोर येत असतात. त्यावर हरकती मागवल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यात एकही उमेदवार असे काही झाल्याचे म्हणायला तयार नाही. राहुल गांधी या मुद्द्यावरून विनाकारण निवडणूक आयोग, देश आणि संसदेचाही वेळ घेता आहेत. बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा काहीतरी डाव असू शकतो, अशी शक्यता मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
कोल्हापुरात महापौर राष्ट्रवादीचाच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आलो आहोत. आम्ही महापौर, स्थायी समिती, सभापती पद अशी सगळी पद घेतली आहेत. आमची कासवाची चाल आहे. यावेळीसुद्धा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार, असा दावा मुश्रीफ यांनी केला.
चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार. परंतु महापौर भाजपचाच असेल.’ या वक्तव्यावर विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी यापूर्वीही असे म्हटलो आहे की महायुती म्हणून सगळे एकत्र लढू. एकत्र होणार नाही तिथे वेगवेगळे लढू. महापौर पद आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महायुतीकडेच राहील. जास्तीत-जास्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी निवडून येतील, यासाठी प्रयत्न करणारच आहोत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, असा आरोप करीत आज राज्यभर मोर्चे काढलेले आहेत. या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, जे आरोप आहेत ते सिद्ध व्हावे लागतात. उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय त्यासाठी आहे. विरोधी पक्षांचे कामच असे आहे की वातावरण सतत असं ढवळणं आणि सत्तारूढ पक्षावर टीका करीत राहणं.