जिल्ह्यत पावसाचा जोर ओसरला असल्याचे चित्र शनिवारी पूर्णत: बदलले असून जिल्ह्यत आज दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. धरण क्षेत्रात जोरदार पावसाने पाणीसाठय़ात वेगाने वाढ होत आहे. दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. पाऊस वाढला असला तरी येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यात सकाळपेक्षा सायंकाळी पाणी पातळी किंचित कमी झाली होती, पण रात्री त्यामध्ये वाढ होईल, असे पूर नियंत्रण विभागातून सांगण्यात आले.

गेल्या चार दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. यामुळे शेतकरी चिंतेत होता. मोठय़ा पावसासाठी केली जाणारी प्रार्थना शनिवारी वरुणराजाने ऐकली. सकाळपासूनच पावसाची संततधारसुरू झाली. गुरुवारपासून राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्याचे आज पहायला मिळाले. विशेषत  धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस दिवसभर पडत राहिला. तसेच कमी पावसाचे क्षेत्र असलेल्या शिरोळ व हातकणंगले तालुक्यातही पाऊस आज सतत बरसत राहिला.