कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत गोंधळ घातला. प्रचंड गदारोळामुळे अभिसभा सदस्यांनी सभात्याग केला. शिवाजी विद्यापीठात आज अधिसभा आयोजित केली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे शिवाजी विद्यापीठ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अधिसभेत गोंधळ घातला. विद्यापीठ विद्यार्थी निवडणुका, कंत्राटी प्राध्यापकाची आत्महत्या, अनेक विभागांमध्ये विभाग प्रमुखांची होत असलेली मनमानी याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरच ठिय्या मारून प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक विद्यार्थ्यांनी प्रशासनाला धारेवर धरता. यावरून अधिसभेत एकच गोंधळ सुरु झाला. परिणामी सदस्यांनी सभात्याग करत काढता पाय घेतला.
