दरमहा १० टक्के व्याजदराने घेतलेल्या एक लाखाच्या कर्जाची परतफेड करूनही व्याजासह आणखी आठ लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी एका महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला सावकारासह अन्य दोन महिलांविरुध्द पोलिसांनी सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. शहरात राजस्वनगरात हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत सविता किरण राठोड (वय २५, रा. राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर) या पीडित महिलेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संगीता राठोड, श्व्ोता दुबे व नारायणकर नावाच्या महिलेविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
सविता राठोड हिला तिच्या ओळखीच्या संगीता राठोड हिने जुल २०१३ मध्ये श्व्ोता दुबे या महिला सावकाराकडून दरमहा १० टक्के व्याजदराने एक लाखाचे कर्ज मिळवून दिले होते. त्यासाठी तिच्याकडून सुरक्षितता म्हणून कोरे धनादेश व कोरे मुद्रांक पेपरही घेण्यात आले होते. त्यानंतर सविता राठोड हिला एक लाख ८० हजारांची रक्कम व्याजापोटी भरण्यासाठी तगादा लावला गेला. त्यासाठी तिच्याकडून सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. दरमहा १७ हजार ५०० रुपयांप्रमाणे १४ महिने रक्कम भरली तरीही आणखी आठ लाखांची रक्कम वसूल होण्यासाठी तिचा छळ करण्यात आला. त्यामुळे अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सहकार विभागाच्या सहकार्याने पोलिसांनी सावकारासह तिन्ही महिलांवर कारवाईचा बडगा उगारला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2015 रोजी प्रकाशित
बेकायदा सावकारीप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल
कर्जाची परतफेड करूनही व्याजासह आठ लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 22-11-2015 at 02:20 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal money lending three women offence