कोल्हापूर : गांधीनगरसह १३ गावांसाठी नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होऊन तीन वर्षे होवूनही ५० टक्केच काम झाले आहे. योजनेबाबतची सगळीच कामे अर्धवट का करता?, असे खडे बोल आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी गांधीनगर नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारांना सुनावले.
गांधीनगर नळपाणी योजनेचे काम रखडले आहे. याबाबत आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ही बैठक झाली. कार्यकारी अभियंता मनीष पवार यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाडिक म्हणाले, ४२३ किलोमीटर जलवाहिनीतील २०९ किलोमीटर झाले. कामाचा वेग संथ आहे. आवश्यक परवानगी मिळवून देतो. योजनेचे वेळापत्रक बनवा. योजनेच्या कामाचा रोज आढावा घ्या. दर पंधरा दिवसांनी माझ्यासोबत जागेवर जाऊन पाहणी करायची. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल.
रस्ते पुनर्निर्माण नाही, कामासाठी रस्ते उकरले आहेत. पण त्यातील अवघे नऊ ते दहा किलोमीटर रस्ते केलेले आहेत, असेही महाडिक यांनी ठेकेदारांना सुनावले.